प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित करत असलेल्या चंद्रमुखी या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरु सुरुवात करण्यात येणार आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत चित्रीकरणास सुरुवात करणारा हा पहिला मराठी चित्रपट असेल. मात्र चित्रीकरणादरम्यान योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचं चित्रपटाच्या टीमचं म्हणणं आहे.
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शक करत आहेत. तर प्लॅनेट मराठीच अक्षय बर्दापुरकर हे पियूष सिंह यांच्यासोबत या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचं संगीत लाभणार आहे. चिन्मय मांडलेकरची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचं कलादिग्दर्शन या चित्रपटाला असेल.
याचवर्षी या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र यात अभिनेत्रीचा चेहरा झाकलेला असल्याने ही भूमिका नेमकी कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र चित्रीकरण सुरु झाल्यानंतर या सिनेमातील या पोस्टरमधील अभिनेत्री नेमकी कोण आहे हे समोर येईल का ? याची उत्सुकता आहे.