'आई कुठे काय करते' या मालिकेला कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्यातच या मालिकेच्या वाहिनीचा टीआरपीदेखील अव्वल आला आहे. सध्या टेलिव्हिजनवरील विविध मालिकांच्या गर्दीत ही मालिका एक वेगळं स्थान निर्माण करत असल्याचं चित्र आहे. यातच या मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने या मालिकेच्या यशाचं श्रेय मालिकेच्या लेखिकांनाही दिलय.
या मालिकेची पटकथा लेखिका नमिता वर्तक तर संवाद लेखिका मुग्धा गोडबोले रानडे या दोन्ही स्त्री लेखिकांचे आभार मधुराणीने मानले आहेत. यासाठी तिने सोशल मिडीयावर खास पोस्ट देखील लिहीली आहे. या दोन्ही स्त्री लेखिका मालिकेला लाभल्याने मालिकेच्या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचं ती म्हणते.
या पोस्टमध्ये मधुराणी त्यांच्याविषयी लिहीते की, "पण खरं सांगू का...आम्ही काय करतो....आम्ही नमिताच्या पटकथेतील vision ला आणि मुग्धाच्या दमदार संवादांना अक्षरशः शरण जातो... आणि आमच्या दिगदर्शकां च्या मार्गदर्शनाखाली ते जीव लावून आमच्यातून उमटवण्याचा प्रयास करतो. नमिता, आमची पटकथा लेखिका जिला ही कथा दिसते... तिचा प्रवास दिसतो...आमची सर्व पात्र बहुदा सतत तिच्या आसपास किंवा कदाचित तिच्या आतच राहत असावीत....ती तिच्या स्वतः पेक्षा अरुंधतीचाच विचार अधिक करत असावी असा मला संशय आहे.... ती अनेक सीन्स लिहिताना स्वतः रडते.... कोसळते...हे माहित आहे आम्हाला....ही लगन कुठून येते, नमिता! आणि त्यातलं थोडं तरी आपण पोहचवू शकतोय का अशी भीती सतत वाटत राहते... तिची ह्या माध्यमावरची पकड आणि समज थक्क करणारी आहे... तुला आमचा सर्वांचा सलाम आहे ..आणि आमची खतरनाक संवाद लेखिका मुग्धा..... !ही कसं इतकं सुंदर , प्रभावी लिहू शकते.... हा प्रश्न प्रत्येक वेळी dialogue copy हातात आली की आम्हाला पडतो...प्रत्येक पात्राची नस हिनी चोख पकडलेय... तिची भाषा समृद्धी आणि योग्य ठिकाणी येणारे चपखल शब्द थक्क करतात... अनेकदा तिची पल्लेदार वाक्य घेताना आमची भंबेरी उडते...पण आमचे दिगदर्शक मात्र ती वाक्य 'जशीच्या तशी' बोलल्या शिवाय आम्हाला सोडत नाहीत मग कितीही वेळ लागला तरी चालेल.ह्या अशा दमदार दोन स्त्री लेखिका आम्हाला लाभल्या ह्यातच तर सारं यश सामावलेल आहे...."
यासह मधुराणीने इतरही टीम मेम्बर्सचे, दिग्दर्शक, निर्माते यांचेही आभार मानले आहेत. मधुराणीने या मालिकेच्या यशाविषयीची ही सविस्तर पोस्ट लिहीली आहे.