कोरोनातून बरे झाले मिथिला पालकरचे आजोबा, शेयर केला हा अनुभव
सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत वयोवृद्धांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र अनेकदा काळजी घेऊनही कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. अभिनेत्री मिथिला पालकरच्या आजोबांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र आता ते कोरोनातून बरे झाले असून त्यांची कोव्हिड चाचणी नेगेटिव्ह आली आहे.
मात्र आजी-आजोबांसोबत राहत असलेल्या मिथिलासाठी हा अनुभव कसा होता तिने नुकतच शेयर केलं आहे. सोशल मिडीयावर मिथिलाने नुकतीच पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये ती आजोंबाना कोव्हिडची लागण झाल्याचा अनुभव सांगते. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येताच आजीच्या काळजीपोटी आजोबांना त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. याविषयी ती या पोस्टमध्ये सांगते. आजी-आजोबांना एकमेकांपासून दूर ठेवणं मिथिलासाठी कसं कठिण गेलं हे ती या पोस्टमध्ये सांगते.
मात्र आजोबा बरे झाल्यानंतर पुन्हा आजी-आजोबा एकत्र आल्याचा अनुभवही ती सांगते. यानिमित्ताने तिला दोघांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता आल्याचं ती सांगते. ती लिहीते की, "मी त्यांचे मौन वाचायला शिकली आहे. आणि ते मला सतत सांगत असतात की "मी सेन्चुरी हिट करणार आहे, तुला एवढ्या लवकर सोडून जाणार नाही."
मिथिलाची ही पोस्ट भावुक करते शिवाय तिचं आजी-आजोबांसोबतचं नातं कसं घट्ट आहे याविषयीही सांगते. यासोबतच मिथिलाने आजी-आजोबांसोबतचे तिचे फोटो पोस्ट केले आहेत.