अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी अनेकांची आवडती जोडी आहे. त्यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन जोडीही गोड दिसते. सोशल मिडीयावरही ही जोडी लोकप्रिय आहे. उमेश आणि प्रियाच्या लग्नाला आज नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने उमेश आणि प्रियाने एका जाहिरातीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये उमेश लिहीतो की, "लग्नाची नऊ वर्षं आणि त्याआधीच्याही अनेक वर्षांपासून तू तशीच आहेस. तू चिडतेस, तू भडकतेस, तू रुसतेस आणि त्याच्या खूऽऽप पटिने जीवही लावतेस. तुला अंदाजही नसेल, की या सगळ्यांतून तुझ्याही नकळत मी घडत असतो. अधिक चांगला माणूस होत असतो. आपलं हे नातं असंच घडण्याचं! आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."
तर प्रिया पोस्टमध्ये लिहीते की, "नवरा म्हणून तू माझ्या सहनशक्तीची लिमीट्स कायमच स्ट्रेच करत आला आहेस खासकरून मला इरिटेड करून मुद्दाम चिडायला लावणं आणि त्याचा आनंद घेणं. पण आपल्या दोघांना माहिती आहे तू खूप जास्त चांगला माणूस आहेस. (माझ्यापेक्षाही जास्त) आपण कायम असच राहूयात खूप प्रेम."
'भेट' या सिनेमाच्या प्रिमियर दरम्यान उमेश-प्रियाची भेट झाली होती. आभाळमाया मालिकेच्या शेवटच्या शूटदरम्यानही ते भेटले होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. मग त्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.'टाईम प्लिज' या सिनेमात दोघं एकत्र झळकले होते. 'आणि काय हवं' ही त्यांची वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय ठरली. नंतर या वेबसिरीजचा दुसरा भागही आला. या वेबसिरीजमधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली.