By  
on  

'हिंग, पुस्तक, तलवार' असं आहे आगामी वेबसिरीजचं नाव, चित्रीकरणाला झाली सुरुवात

 प्लॅनेट मराठी या पहिल्या पहिल्या मराठी ओटीटीवर येण्यासाठी अनेक वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यातच 'हिंग, पुस्तक, तलवार' ही वेबसिरीजदेखील आहे. या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा नुकताच करण्यात आला. निपुण धर्माधिकारी या सिरीजचं दिग्दर्शन करतोय. याशिवाय त्याच्यासोबत मकरंद शिंदे नितीश पाटणकर, अनुपम बर्वे हे देखील दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या वेबसिरीजमध्ये आलोक राजवाडे, नील साळेकर, सुशांत घाटगे, मानसी भवाळकर, शौनक चांदोरकर, क्षीतिज दाते, केतकी कुलकर्णी, मुग्धा हसमनीस हे कलाकार पाहायला मिळतील.  केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, निपुण धर्माधिकारी, अमृत आठवले यांच्या 'सिक्सटीन बाय सिक्सटी फोर प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड' अंतर्गत 'हिंग, पुस्तक, तलवार' या वेबसिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे.

 या वेबसिरीजचं हटके नाव आकर्षणाचा विषय ठरतोय. या वेबसिरीजची कथा सहा व्यक्तिंच्या अवतीभवती फिरणारी आहे. ही एक विनोदी वेबसिरीज असून याचे आठ भाग प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सिरीजविषयी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी सांगतो की, "प्रेक्षकांना पहिल्यांदाच जरा वेगळी आणि रंजक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपल्या जवळपास वावरणारी असून एखादे पात्र आपल्यातही कुठेतरी दडल्याचे भासवणारी आहे. मुळात यातील कथा दैनंदिन आयुष्याशी जवळीक साधणाऱ्या असल्याने त्या सर्वच वयोगातील प्रेक्षकांना आवडतील. 'हिंग, पुस्तक, तलवार'च्या माध्यमातून काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला आहे, मला खात्री आहे हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल.''   

 

प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, "प्रेक्षकांना काहीतरी चौकटीबाहेरचे आणि दर्जेदार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. तेच तेच विषय हाताळण्यापेक्षा काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशानेच आम्ही ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. याआधी आम्ही एक लव्हस्टोरीची घोषणा केली होती. आता ही विनोदी सिरीज घेऊन येत आहोत. ओंकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांच्या लेखणीतून ही वेबसेरीज तयार झाली असून, ही वेबसिरीज मे  2021 मध्ये प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive