सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुद्दा गाजत आहे तो म्हणजे अमोल कोल्हे यांच्या घराचा. अभिनेता अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी स्वत:चं घर विकल्याचं समोर आलं होतं. यावरून आरोप प्रत्यारोप करताना विरोधी पक्षांनी अमोल यांच्यावर आरोप केले आहेत. याला उत्तर म्हणून मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. पाहु काय म्हणतात कार्तिक या पत्रात...
प्रिय मित्र
डॉ. अमोल कोल्हे यांस
सर्वप्रथम तुझे मन:पुर्वक, जाहीर अभिनंदन. खरंतर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून, मा. शरद पवार साहेबांनी तुमचे नाव जाहीर केले, त्याच दिवशी तुझे अभिनंदन केले होते. पण आज जाहीरपणे अभिनंदन करावेसे वाटले, त्याचे कारणही महत्वाचे. गेले दोन / चार दिवस स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या मालिकेसाठी तू विकलेल्या घराची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.
आता ह्या चर्चेची सुरूवात ही – छत्रपती संभाजी महाराजांवरील भक्तीमुळे, महाराष्ट्राच्या या ज्वलज्ज्वलन इतिहासाच्या अभिमानामुळे सुरू झाली की तुझ्यावर फक्त आरोप करून, राजकीय फायद्यासाठी ही चर्चा सुरू केली गेली , हे मला महत्त्वाचे वाटत नाही, राहता राहीला प्रश्न चर्चा सुरू करण्याचा तर, सध्या कोणतीही चर्चा ही paid news किंवा package ह्या संकल्पनेच्या आधारे करता येतेच, असो….
मित्रा, स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका करण्याच्या निर्णयापासून ते आज हे जाहीर पत्र लिहिण्याच्या, ह्या क्षणापर्यंत मी तुझ्यासोबत आहे. ह्या संपूर्ण प्रकीयेमधील प्रत्येक दिवस, प्रत्येक घटना, प्रत्येक संकट ह्या सर्वाचा मी साक्षीदार आहे. आणि त्यामुळेच ह्या सध्याच्या चर्चेवर जाहीर भाष्य करावे असे मला वाटले, म्हणून हा पत्रप्रपंच…
तर…
व्हा ९ जाने ते २० जाने २०१७रोजी ह्या मालिकेचे पहीले चित्रीकरण करून, आपण सगळे मुंबईला आलो आणि २१ जाने २०१७ रोजी आपल्याला संबंधित वाहिनीकडून सांगण्यात आले की ही मालिका आम्ही करणार नाही, तेव्हा पायाखालची जमिन सरकली होती. ७/८ वर्षांची आपल्या संपूर्ण टिमची मेहनत पाण्यात गेली, असे मला वाटले होते, संपूर्ण टीम युद्ध हारल्याप्रमाणे, शस्त्र खाली ठेऊन, खालमानेने, ह्या संकटातून बाहेर पडण्याचा विचार करीत होती.
पण मित्रा, तू हरला नाहीस, संभाजी महाराजांवरील श्रद्धेमुळे तू , त्याही परिस्थितीत लढलास. आणि परिस्तिथी बदललीस, मालिका पुन्हा सुरू केलीस, हाती पैसा नाही , होते फक्त स्वप्न…आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू कुठलाही विचार न करता परळ येथे घेतलेले घर विकलेस, तुझी गाडी विकायला ठेवलीस, आणि मालिकेचे चित्रीकरण सुरू केलेस.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी तू केलेली महनत, तू केलेला अभ्यास आणि तू केलेला त्याग, ह्या सगळ्याचाच मी साक्षीदार आहे…आणि म्हणूनच तूला जाहीर विनंती करतो की, ह्या जगाला, तुझ्यावर असे आरोप करणाऱ्यांना, त्याविषयी रंजक बातम्या छापणाऱ्यांना, आणि त्यामुळे चर्चा करणाऱ्यांना , हे सगळं करू दे. जिंकण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातील, तुझ्याविरूद्ध बोलायला काहीच नसल्यामुळे , तू जाहीर केलेल्या संपत्तीबद्दल, तूझ्या घर विकण्याच्या घटनेबद्दल, उलटसुलट अर्थ लावतील. मालिका थांबली तेव्हाची तुझी परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्या मधली जवळ जवळ २ वर्षे ह्या आरोप करणाऱ्यांना माहीत नाहीत, पण मी आणि आपली संपूर्ण टीम ह्याची साक्षिदार आहे.
तू शंभूभक्त आहेस, महाराजांचा मावळा आहेस, त्यामुळे मला खात्री आहे की ह्या आरोपांमुळे तू डगमगणार नाहीस. अरे मित्रा, घर विकताना डगमगला नाहीस, तर ह्या माणसांच्या खोट्या आरोपांमुळे तर डगमगण्याचा विचारही तुझ्या बुद्धीला शिवणार नाही.
गेली १३ वर्षे तुला ओळखणारा, गेली ८ वर्षे तुझ्यासोबत असणारा, आणि कायमच तुझे यश चिंतणारा तुझा मित्र-
कार्तिक राजाराम केंढे
(दिग्दर्शक – स्वराज्यरक्षक संभाजी’)