ज्येष्ट नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं राहत्या घरी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. श्रीकांत मोघे हे 91 वर्षांचे होते. मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वात एक चॉकलेट हिरो म्हणून त्यांची एकेकाळी ओळख होती.
रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये अधीक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 6 नोव्हेंबर 1929 मध्ये किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्करवाडी येथे झालं. बीएससीसाठी ते पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये गेले होते. तर मुंबईत त्यांनी बी.आर्च ही पदवी घेतली होती. शाळेत असतानाचा त्यांना नाटकाविषयीची गोडी निर्माण झाली. श्रीकांत मोघे यांनी 60 हून अधिक नाटकं आणि 50 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या नाट्यप्रवासावर त्यांनी 'नटरंगी रंगलो' हे आत्मचरित्रही लिहीलं आहे.
वसंत कानेटकर यांच्या 'लेकुरे उदंड' झाली नाटकामधील राजशेखर उर्फ राजा असो की पु.ल.देशपांडे यांच्या 'वाऱ्यावरची वरात' मधील बोरटाके गुरुजी यातून त्यांनी रसिकांना आनंद दिला. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 2005-06 मध्ये महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, 2010मध्ये काशिनाथ घाणेकर पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा पुरस्कार, 2012 मध्ये सांगली येथे झालेल्या 92व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, 2013 मध्ये गदिमा पुरस्कार, 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारचा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार या आणि इतर अनेक पुरस्कारांनी श्रीकांत मोघे यांना गौरवण्यात आले आहे.
श्रीकांत मोघे यांच्या निधनाच्या बातमीने मराठी नाट्य आणि सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. पिपींगमून मराठीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.