नुकतीच 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी विजेत्या कलाकारांची, चित्रपटांची नावे घोषित करण्यात आली आहेत. मराठी चित्रपटांनीही यंदा या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारल्याचं पाहायला मिळतय.
प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्रलाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. बार्डो या चित्रपटातील रान पेटलं या गाण्यासाठी सावनीला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा सावनीचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असून याविषयी तिने पिपींगमून मराठीशी बोलताना तिची प्रतिक्रिया शेयर केली आहे.
सावनी म्हणते की, "खूप छान वाटतय आणि थोडं अविश्वसनीयही वाटतय. हे गाणं रेकॉर्ड करताना स्पेशल वाटलच होतं कारण हे गाणं मी वेगळ्या आवाजात, वेगळ्या टेक्शचरमध्ये मी गायलं होतं. रोहन-रोहन यांचं संगीत आहे या गाण्याला. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मी वेगळं काहीतरी गाऊ शकेल. हे रुटीन गाणं नाहीय, एका वेगळ्या टप्प्याला येतं हे गाणं सिनेमात. ही फिल्मही खूप अप्रतिम आहे. मला खूप आनंद आहे की मी या फिल्मचा भाग होऊ शकले. हे गाणं रेकॉर्डी करूनही खूप वर्षे झाली आहेत. आणि आता परत एकदा त्या आठवणी जागवतेय असं वाटतय."
याशिवाय तिच्या गायन क्षेत्रातील करियरमध्ये तिला साथ देणाऱ्या व्यक्तिंचेही तिने आभार मानले आहेत. ती सांगते की, "अर्थात याच्यात देवाची खूप कृपा आहेचे आणि आई-बाबांचे आशिर्वाद आहेत. संपूर्ण कुटुंबाची आणि पतिची साथ असल्यामुळे मी हे करु शकले असं वाटतय."