By  
on  

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात "नो टेन्शन, फुल्ल टशन", केली आगामी चित्रपटाची घोषणा

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कायम प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करुन विविध विषय हे सिनेमा, मालिका, नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले. आता तीन वर्षांच्या गॅप नंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. ‘बाईपण भारी देवा’ असं त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अतिशय वेगळ्या अंदाजात या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करत याची घोषणा केली आहे. ते लिहीतात की, "ता खऱ्या अर्थाने लॉकडाउन संपेल... नो टेन्शन, फुल्ल टशन."

निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती असलेल्या, ‘बाईपण भारी देवा’ अशा वेगळ्या नावामुळे लक्षवेधून घेणार्‍या या चित्रपटाचे पोस्टर सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे. गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असलेल्या या पोस्टरवरून चित्रपटाच्या वेगळेपणाचा अंदाज येतोय. तसेच ‘नो टेन्शन, फुल्ल टशन.’ या कॅच लाईनमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढली आहे.स्क्रीनशॉटस् या निर्मिती संस्थेचे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण होत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वैविध्यपूर्ण कलाकृतीमधून विनोदी, कौटुंबिक विषय मांडले आहेत.  त्यांच्या चित्रपटांचा प्रेक्षक सहकुटुंब आस्वाद घेतात. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. येत्या 28 मे 2021 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive