सध्या सगळीकडे आयपीएलचे वारे वाहत असतानाच आता मराठी मनोरंजन क्षेत्राची क्रिकेट टूर्नामेंट लवकरच सुरु होत आहे. यातच कलाकारांचा क्रिकेटचा जोरदार सराव सुरु आहे. मात्र या सरावादरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवला दुखापत झाली आहे.
या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव हा एका संघाचा कर्णधार आहे. त्यासाठी सिद्धार्थचा सराव सुरु होता. मात्र या सरावादरम्यान सिद्धार्थच्या हाताच्या अंगठ्याला मार लागला आहे. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला ही दुखापत झाली असून त्याला चार टाके पडले आहेत. दुखापत झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले.
मात्र आता उपचार झाल्यावर दुखापत असतानाही सिद्धार्थ आराम न करता पुन्हा क्रिकेटच्या सरावाला त्याने सुरुवात केली आहे. अभिनयासोबतच सिद्धार्थला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. तो एक क्रिकेटप्रेम आहे. म्हणूनच दुखापतीनंतरही लगेचच सरावासाठी तयार झाला आहे.
सोशल मिडीयावरही सिद्धार्थचं क्रिकेटप्रेम पाहायला मिळतं. त्याने पहिल्यांदा स्टेडियममध्ये पाहिलेल्या सचिनच्या मॅचचा अनुभवही शेयर केला होता. तेव्हा या सरावानंतर सिद्धार्थ क्रिकेट टूर्नामेंटमध्ये चौकार आणि षटकारांनी बाजी मारेल यात शंका नाही.