By  
on  

"तू आहेस म्हणून विनोद शिल्लक आहे" म्हणत समीर चौगुलेने चार्ली चॅप्लिनसाठी केली खास पोस्ट

मुकपट करणारा एक प्रख्यात आणि रचनात्मक अभिनेता म्हणजे चार्ली चॅप्लीन. अनेक कलाकारांसाठी खासकरुन विनोदी भूमिका किंवा कॉमेडी करणाऱ्यांसाठी तो जणू देवच आहे. ज्याने संपूर्ण जगाला हसवलं असा तो कलाकार. आज चार्ली चॅप्लीनच्या जन्म दिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकार आपल्या या देवाला जन्म दिनाच्या शुभेच्छा असलेल्या पोस्ट करत आहेत. 

अभिनेता समीर चौगुले याची एक उत्तम अभिनेता म्हणून ओळख आहे. विविध विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याने आत्तापर्यंत प्रेक्षकांना हसवलय. नाटक, विनोदी कार्यक्रम, सिनेमे या माध्यमातून तो आपलं अभिनय कौशल्य दाखवतो. सध्या हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून समीर चौगुलेने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच समीर चौगुलेसाठी देखील चार्ली चॅप्लीन हा देव आहे. म्हणूनच त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने समीरने एक खास पोस्ट केली आहे.

तो लिहीतो की, "सर चार्ल्स चॅप्लिन....वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. आणखीन वेगळं काय हो देणार आम्ही तुम्हास....तुम्हीच दिलेलं पाहून पाहून अजून मन भरलं नाहीय....डोळ्यांचा "आ" करून पापणी न लावता तुला लहानपणापासून तुलाच तर बघत आलोय न देवा!!...शाळेत असताना आयुष्यात पहिल्यांदा तुझा "the kid" बघितला होता तेंव्हा रात्रभर मी स्वतःला त्या लहान मुलात imagine केलं होतं..फाटलेले कपडे, शरीराला न पेलवणारे जीर्ण बूट...हृदयात जगाला पुरून उरेल एवढी माया आणि डोळ्यात (uff या डोळ्यांचं काय करू!!) मिश्किल कारुण्य यामूळे देवा कायमचा काळजात घुसलास रे तू आमच्या!! हास्यजत्रेच्या निमित्ताने मला चार्ली साकारता आला...तुझ्या जवळपास जाण्याच्या तो प्रयत्न ही नव्हता कारण अहो देवाची बरोबरी कोणी करत का? मी साकारलेला चार्ली ही माझ्या देवाला अंतःकरणाने ...मनापासून दिलेली मानवंदना होती....तू आहेस म्हणून विनोद शिल्लक आहे, स्वतःवर विनोद करायची ताकद तुझ्याकडे बघून आम्हाला मिळते...किती ही संकट आली तरी ओठ विस्फारून त्यांचा सामोरं जायची उर्मी तू दिलीस देवा.....देवा खूप आहे लिहिण्यासारखं...तूर्तास वाढदिवसाच्या शुभेच्छा सर चार्ल्स चॅप्लिन."

हास्यजत्रा या कार्यक्रमात समीरने एका भागात उत्तम चार्ली साकारला होता. त्यासाठी त्याचं बरचं कौतुकही झालं होतं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive