मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात एक असा चेहरा दिसला जो हुबेहुब बॉलीवुड स्टार मलायका अरोरा सारखा होता. ती अभिनेत्री, नृत्यांगना म्हणजे हिना पांचाळ. मराठी बिग बॉसमध्ये तिने तिच्या नृत्याने आणि चांगल्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली. आता हिना पुन्हा चाहत्यांना तिच्या नृत्याच्या प्रेमात पाडतेय. नुकतच हिनाचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.
"लैला झाली पगली अन मजनू झाला मोगली" असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात हिनाचा जबरदस्त डान्स आणि अदा पाहायला मिळत आहेत. हे गाणं सध्या सगळीकडे चर्चेत आलं आहे. हिनाने तिच्या नृत्याने आणि अदांनी या गाण्याची शोभा वाढवली आहे. थिरकायला लावणारं हे गाणं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतय.
मलायका अरोरा सारखी दिसणारी नृत्यांगना म्हणून नाही तर हिनाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलं आहे. सोशल मिडीयावर हिनाचा मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर हिनाचे विविध डान्स व्हिडीओही पाहायला मिळतात.
हिना ही 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या मंचावरही दिसली होती. तेव्हा चक्क मलायका अरोराही तिला पाहुन थक्क झाली होती. 'मुझसे शादी करोगे' या रिएलिटी शोमध्ये देखील हिनाचा स्पर्धक म्हणून सहभाग पाहायला मिळाला होता. हिनाने अनेक मराठी आयटम साँगही केले आहेत.