By  
on  

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन, त्यांच्या निधनानं सिनेविश्वात 'सन्नाटा'

देशात कोरोनाने थैमाल घातला आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. प्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ठाण्यातली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किशोर यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमधून काम केलं आहे. 'नाना करते प्यार', 'सारे सज्जन', 'शेजारी शेजारी', 'हळदी रुसली कुंकू हसले' या आणि इतर अनेक सिनेमांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. 'चल आटप लवकर', 'भ्रमाचा भोपाळा', 'पाहुणा', 'श्रीमान श्रीमती', 'भोळे डॅम्बीस', 'वन रुम किचन' या नाटकांमधून त्यांनी काम केले आहे.

'वास्तव' या हिंदी सिनेमातीलही त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. एक उत्तम विनोदी कलाकार म्हणून त्यांची ओळख होती 'जिस देश गंगा रहता है' या गोविंदाच्या सिनेमातील त्यांनी साकारलेली 'सन्नाटा' ही भूमिका चांगलीच गाजली होती. याशिवाय 'तेरा मेरा साथ', 'खाकी', 'ये तेरा घर ये मेरा घर', 'हलचल', 'सिंघम', 'प्राण जाए पर शान ना जाए' या आणि इतर हिंदी सिनेमांमधून त्यांनी काम केलय. 

किशोर नांदलस्कर यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive