मागील वर्षाप्रमाणे पुन्हा यावर्षी कोरोनाचा फैलाव वाढला. राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. या विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, बेड, विविध महागडी इंजेक्शन या सगळ्याचा तुटवडाही भासतोय. मात्र या गोष्टी उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. या सगळ्या परिस्थितीचा राग सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात उमटतोय. या सध्याच्या परिस्थितीचा राग अभिनेता आस्ताद काळे याने व्यक्त केला आहे.
मनोरंजन विश्वातील कलाकार हे अनेकदा सोशल मिडीयावर व्यक्त होत असतात. त्यांचा आनंद, दु:ख किंवा राग ते या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात. अभिनेता आस्तादही नुकताच एका पोस्टद्वारे व्यक्त झाला आहे.आस्तादने नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने राजकारणी, सरकार आणि देश यांच्याविषयीही संताप व्यक्त केला आहे. सत्तेच्या प्रत्येकाला सध्याच्या परिस्थितीविषयी प्रश्न विचारणार असल्याचं तो या पोस्टमध्ये म्हणतोय.
आस्ताद लिहीतो की, "प्रश्न विचारायचे आहेत...स्वत्व जपायचं आहे....कदाचित जीव गमवावा लागू शकतो...कारण.. श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही...अरे हाड.....आम्ही प्रश्न विचारणार....सत्तेच्या आणि सत्तेत्ल्या प्रत्येकाला....उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार......नागडे राजकारणी...नागडं सरकार...नागडा देश....निरोप घेतो...."
या पोस्टमधून त्याने सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळतय. मात्र या पोस्टच्या शेवटी त्याने "निरोप घेतो" असं म्हणटल्यानं याविषयी अनेकांना प्रश्न पडलाय. आस्ताद सोशल मिडीया सोडून जातोय की काय असं त्याच्या फॉलोवर्सना वाटतय.