अनेक मराठी चित्रपटांमध्ये जगभरातील नयनरम्य दृश्ये पाहायला मिळतात. भारतासह भारताबाहेरील विविध सुंदर देशांमध्येही मराठी चित्रपटांचं चित्रीकरण केलं जातं. मात्र चित्रपटाचा विषय तसा असेल तरच ते भारताबाहेर चित्रीत करण्यात येतं. असाच एक मराठी चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करण्यात आला होता. या चित्रपटाचं नाव आहे 'मुक्कामपोस्ट लंडन'. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आलं होतं.
अभिनेता भरत जाधव यांनी नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर केली आहे. ती पोस्ट याच चित्रपटासंदर्भातील आहे. 'मुक्कामपोस्ट लंडन' या चित्रपटाची खास आठवण त्यांनी शेयर केली आहे. या चित्रपटाच्या सेटवरील दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबतचा फोटो भरत यांनी पोस्ट केला आहे.
2007 मध्ये आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं होतं. या चित्रपटात भरत जाधव, मोहन जोशी आणि रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. एक तरुण गावकरी आपल्या वडिलांच्या शोधात लंडनपर्यंत कसा येतो आणि त्यांचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. याच चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेयर करून भरत जाधव यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
ते लिहीतात की, "मुक्काम पोस्ट लंडन च्या शुटींग दरम्यानचा फोटो. लंडन मध्ये चित्रीत झालेला पहिला मराठी चित्रपट"