कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात थैमान घातलय. या कोरोनाविरुद्ध लढ्यात अनेकांनी आपला जीव गमावला. अशा परिस्थितीत अनेक जण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात विविध क्षेत्रासह मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही समावेश आहे. यात आत आणखी एक मदतीचा हात समोर आला आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत देऊ केली आहे. कोविड 19 च्या काळात या विषाणूपासून लोकांचा बचाव करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अभाव होऊ नये यासाठी अशा पद्धतीची मदत उपयोगी ठरतेय. लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने अनेकदा लतादीदींनी मदतीचा हात पुढे केलेला आहे.
कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.