By  
on  

पाहा Trailer : या दिवशी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार 'फोटो प्रेम' हा चित्रपट, अभिनेत्री नीना कुळकर्णी मुख्य भूमिकेत

अमेझॉन प्राइम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे 'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात 7 मे रोजी करण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. आदित्य राठी आणि गायत्री पाटील यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट या बॅनरअंतर्गत झाली असून नीना कुळकर्णी, अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. 

 ही एका माई नावाच्या व्यक्तिरेखेची कथा आहे. माई या एका मृत व्यक्तिला श्रद्धांजली वाहायला जातात. तिथे लावलेला फोटो पाहुन त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. तिथे त्या मृत व्यक्तिच्या लहानपणीचा फोटो चक्क हार फुल घालून टांकण्यात येतो. ते पाहुन माई चिंतीत होतात.  तेव्हा मृत्यूनंतर लोक आपल्याला कसे लक्षात ठेवतील हा विचार सुरु होतो. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्याचा तिचा प्रवास सुरु होतो. यात तिची कॅमेऱ्याची भिती घालविण्याचा आणि शेवटी या भितीवर मात करत स्वत: फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलाय.

दिग्गज कलाकार आणि मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी या चित्रपटाविषयी म्हणतात की, “'फोटो प्रेम' ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणे हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शविण्यात आली आहे आणि या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही हा चित्रपट तयार केला तेवढेच प्रेक्षकांचेही प्रेम या चित्रपटाला लाभेल, अशी मला आशा आहे.”

या चित्रपटाबद्दल सांगताना नवोदित दिग्दर्शक आणि सहलेखक आदित्य राठी म्हणाले की, “फोटो प्रेम' ही एका सामान्य प्रसंगाची असामान्य कथा आहे आणि प्रत्येकाला ही कथा त्यांच्या जवळची कथा वाटेल. प्रत्येक माणसामध्ये आढळणारी भावनिक बाजू या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. आपल्या मृत्यूनंतर जग आपल्याला कसे लक्षात ठेवेल याचा ते विचार करू लागतात, हा धागा या चित्रपटाच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडियोशी सहयोग केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, कारण त्यामुळे मराठी प्रेक्षकांसोबतच भारतभरातील प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचू शकेल. अलीकडेच आमचा ‘पिकासो’ हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित करण्यात आला. त्याच्या यशाच्या आनंदाचा आम्ही आस्वाद घेत असतानाच आता या स्ट्रीमिंग सर्व्हिसवर आम्ही 'फोटो प्रेम' हा आमचा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. मराठी भाषेत अत्यंत दर्जेदार चित्रपट अलीकडे प्रदर्शित होत आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आणि 'फोटो प्रेम' हीसुद्धा त्याच शृंखलेमधील पुढील कलाकृती असेल, असा मला विश्वास आहे.”

उत्कंठावर्धक ट्रेलर पाहिल्यानंतर हा अनेकांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली असणार एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive