By  
on  

'राजी' सिनेमाची आठवण शेयर करताना अभिनेत्री अमृता खानविलकर सांगते, "2015 नंतर दोन वर्षे काहीच काम नव्हतं"

2018 मध्ये आलेल्या 'राजी' या हिंदी सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट, विकी कौशल, सोनी राजदान, जयदीप अहलावत, शिशिर शर्मा हे कलाकार झळकले. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकरचीही महत्त्वाची भूमिका होती. मुनीरा हे एका पाकिस्तानी मुस्लिम स्त्रीचं पात्र तिने या सिनेमात साकारलं होतं. या सिनेमाआधी दोन वर्षे अमृताकडे कोणतच काम नव्हतं. मात्र हा प्रोजेक्ट हाती आला आणि या भूमिकेतून अमृताने सगळ्यांची मनं जिंकली. नुकतच 'राजी' या सिनेमाला तीन वर्षे पूर्ण झाली आहे. याच निमित्ताने अमृताने सोशल मिडीयावर या सिनेमाविषयीची आठवण शेयर केली आहे.

या सिनेमाच्या एका कार्यक्रमाला संपूर्ण कास्ट आणि टीमने हजेरी लावली होती. सिनेमाचा निर्माता करण जौहरही या कार्यक्रमात सहभागी झाला होता. ज्याने मंचावर अमृताचं कौतुक केलं होतं. हा व्हिडीओ अमृताने आठवण म्हणून शेयर केला आहे. 

 

अमृता या पोस्टमध्ये लिहीते की, "तुमच्यासोबत एक छोटासा किस्सा शेयर करतेय की मी कशी या अप्रतिम सिनेमाचा भाग झाले. 2015 मध्ये कट्यार काळजात घुसली प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जवळपास दोन वर्षे माझ्याकडे काहीच काम नव्हतं. काहीच नाही. 2017 मध्ये मी आणि हिमांशू कुठेतरी प्रवास करत होतो आणि मुंबईत परतत होतो. त्यावेळी एअरपोर्टवर हिमांशूने सुचवलं की "अमू तू काम केलेल्या कास्टिंग डायरेक्टर्सना कॉल का नाही करत, माहित नाही कदाचीत काहीतरी होईल."  तेव्हा मी लगेच कास्टिंग डायरेक्टर  जोगी सरांना कॉल केला. ज्यांना मी काही वर्षांपूर्वी ओळखायचे. जोगी सरांनी एका रिंगमध्ये फोन उचलला आणि भेटण्यासाठी तयार झाले. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या कार्यालयात गेले आणि मला स्क्रिप्ट देण्यात आली. मी स्क्रिप्ट वाचली आणि त्यांना सांगीतलं की "सर खूप उर्दू आहे". मग ते म्हणाले "काळजी करू नको होऊन जाईल." दोन दिवसांत मला त्यांच्याकडून कॉल आला की "तुला धर्माच्या ऑफिसमध्ये मेघना गुलजार यांना भेटायला जायचय. त्यानंतर फोन कर मला". मी लखनवी कुर्ता परिधान केला होता आणि धर्माच्या ऑफिसमध्ये गेले. एक मित्र आणि जुना सहकारी (चंद्रदीप) या सिनेमावर काम करत होता. तो तिथे भेटला. तो काही बोलला नाही. मी वाट पाहिली आणि मग मेघना मॅम आल्या. त्या म्हटल्या की त्यांना ऑडिशन आवडलं पण त्यांना माझ्या उर्दूवर काम करावं लागेल कारण भूमिका ही पाकिस्तानी मुस्लिमची होती. मी म्हटलं "ओके" आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं. मी त्यांना विचारलं "तुम्हाला अजून ऑडिशन नकोय का ?" त्या हसल्या आणि म्हटल्या "नाही, तुझं स्वागत आहे." त्या तिथून निघाल्यानंतर मी तिथे एकटीच बसून राहीले. ती प्रतीक्षा.. काम नसलेला काळ आणि मी आता ऑफिसमध्ये बसून कॉफी पित होते. हे कसं सहज सोप्या पद्धतिने घडून आलं.. हे खरच सोपं होतं का? काही गोष्टी ज्या तुमच्यासाठी असतात त्या तुमच्याकडे नक्की येतात. त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. राजीसाठी काम करणं हे अनेक स्तरावर पूर्णत्व होतं. खासगी आणि प्रोफेशनल दृष्ट्याही. मला खूप धन्यवाद मानायचे आहेत जोगी सर आणि मेघन गुलजार मॅमचे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही भूमिका दिली. संपूर्ण कास्टचेही धन्यवाद. आलिया भट, विकी कौशल, सोनी राजदान, जयदीप अहलावत, जय पटेल, रंजीत सर, शिशिर सर आणि इतर क्रू. राजी माझ्यासाठी खास होता, आहे आणि कायम असेल."
 

या सविस्तर पोस्टमधून अमृताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive