कोणत्याही क्षेत्रात एकत्र काम करणाऱ्यांचा एक परिवार तयार झालेला असतो. विशेषकरून मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट, नाटक किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र काम करणाऱ्या कलाकारांचं जणू एक कुटुंबच तयार होत असतं. असचं छान कुटुंब आहे येऊ कशी तशी मी नांदायला. या मालिकेतील कलाकारांची बॉंडिंग उत्तम आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबापासून महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करत असलेल्या या कलाकारांना परिवारासारखा एकमेकांचा आधार आहे.
नुकतच या मालिकेच्या सेटवर एक पत्र आणि केक आला. हे खास सरप्राईज होतं अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासाठी. मदर्स डेच्या निमित्ताने मुलगी सखी गोखलेने हा केक आणि पत्र पाठवलं होतं. मात्र हे पत्र वाचताना शुभांगी गोखले यांना अश्रू अनावर झाले. त्यांना रडताना पाहून इतरही कलाकार भावुक झाले. त्यानंतर शुभांगी गोखले यांच्यासोबत सगळ्यांनी केक कटींग केलं.
या पत्रात सखी लिहीते की, "अम्मा शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शुभांगी आणि येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील सर्वा ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद."
शुभांगी गोखले यांनी नुकतीच सोशल मिडीयावर याविषयी पोस्ट केली आहे. त्या लिहीतात की, "आयांना मुलांच्या आठवणीनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं.. सखी, या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम..सगळं भरुन पावलं."