अलबत्या गलबत्या या बालनाट्याने बच्चेकंपनीचं चांगलच मनोरंजन केलं होतं. हाऊस फुल्लचे सर्वे रेकॉर्ड तोडणाऱ्या या बालनाट्याने नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत. सत्तरच्या दशकात अलबत्या गलबत्या हे नाटक गाजलं होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या नाटकात चेटकीण साकारली होती. अनेक वर्षांनी हे नाटक पुन्हा बालक पालकांच्या भेटीला आलं, ज्यात अभिनेते वैभव मांगले यांनी चेटकीण साकारली.
या चेटकीणीने "किती गं बाई मी हुश्शार किती गं बाई मी हुश्शार" म्हणत बच्चेकंपनीचं मनोरंजन केलं. सध्याच्या कोरोना काळात एकिकडे नाट्यगृहे बंद असताना बालक पालक उत्सुकतेने या नाटकाची वाट पाहत आहेत. घरात बसून कंटाळलेली बच्चेकंपनी चेटकीणीला भेटण्यासाठी आसुसले असल्याचं या नाटकाचे निर्माते सांगतात.
या निमित्ताने नाटयनिर्माते राहुल भंडारे यांच्याशी पिपींगमून मराठीने संवाद साधला. सध्याच्या कोरोना काळात बच्चेकंपनीला या नाटकाची आठवण येत असल्याचं ते सांगतात. ते म्हणतात की, “कोरोना नसतं तर कदाचित आम्ही 3 वर्षांमध्ये 1000 प्रयोगांचा पल्ला गाठला असता. आम्ही दीड वर्षामध्ये 500 प्रयोग केले होते. 2021 पर्यंत आम्हाला या नाटकाचे 1000 प्रयोग करण्याचं टार्गेट होतं. पण कोरोनाचं हे संकट सगळ्यांवरच घोंगावत आहेत त्यामुळे आता परिस्थिती व्यवस्थित होण्याची वाट पाहतोय. सध्या नीट सगळं सावरु द्या त्यानंतर नाटक पुन्हा आणण्याची भावना आहे. लोकांच्या अजूनही या नाटकासाठी प्रतिक्रिया येत आहेत. मुलांना खूप कंटाळा येतोय अशा पालकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. माझ्या घरातच एक उदाहरण आहे. माझी चार वर्षांची मुलगी आहे. ती सतत सांगते असते की तिला चेटकिणीला बघायचं आहे. मधल्या वेळात हे नाटक दाखवलं होतं त्यामुळे बच्चेकंपनीची आणि पालकांची उत्सुकता आणखी वाढलीय.”
परिस्थिती व्यवस्थिती झाल्यावर ताकदीने हे नाटक पुन्हा घेऊन येणार असल्याचही राहुल भंडारे सांगतात.