राज्यासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातलय. मागील वर्षापासून कोरोनामुळे विविध क्षेत्रांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलय. यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विविध क्षेत्रांचं मोठं नुकसान होतय. यात मनोरंजन विश्वाचाही समावेश आहे. सध्या अनेक मराठी मनोरंजन क्षेत्राचं चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहेत. ज्यामुळे अनेक अडथळे आणि समस्या उभ्या राहिल्यात. यातून तोडगा काढण्यासाटी मनोरंजन विश्वातील मान्यवरांनी नुकतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंसोबत संवाद साधला आहे
नुकतच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने झूम व्हिडीओ संवादाचं आयोजन केलं होतं. ज्यात नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका क्षेत्रातील मान्यवर या संवादात सहभागी झाले होते. या मान्यवरांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला आहे. सध्या राज्यात चित्रीकरणाला परवानगी नाही. तर ही परवानगी मिळावी याशिवाय राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या या कलाकारांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याविषयी सोशल मिडीयावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये ते लिहीतात की, "मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला आणि समस्या समजून घेतल्या. राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या ‘झूम’ संवादाचं आयोजन केलं होतं."
या कलाकार आणि मान्यवरांनी मांडलेल्या समस्या आणि मागण्यांविषयी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.