आज गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूची आठवण काढतो. अभिनेता अनिकेत विश्वासरावने सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुपरस्टार अशोक सराफ ह्यांना अनिकेत विश्वासराव गुरूस्थानी मानतो.
अनिकेतने आपल्या लाडक्या अशोकमामांविषयीच्या भावना एका पत्राव्दारे व्यक्त केल्या आहेत. हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करताना तो म्हणाला, “सिनेमा पाहू लागलो, तेव्हापासून त्यांचा चाहता झालो. अभिनय करायला लागलो आणि त्यांना गुरू मानलं. गेल्या 12 वर्षांच्या सहवासात त्यांना कधी सांगितलं नाही, आज पहिल्यांदा माझ्या गुरूला लिहीलेलं हे मनोगत.“
त्याने पत्रात खालील मजकूर लिहीला आहे -
https://twitter.com/ANIKETCV/status/1022718026574176256
प्रिय अशोकमामा,
आज गुरूपौर्णिमेचा दिवस. ह्या सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्या अगोदरपासूनच तुम्हांला गुरूस्थानी मानणा-या माझ्यासाठी आजचा दिवस महत्वाचा. अभिनय असो, किंवा विनोदाची अचूक वेळ साधणं असो तुम्ही दोन्हीमध्ये ‘बाप’ आहात. हे तुम्ही वेळोवेळी सर्वांना दाखवून दिलंय. नाटक, टीव्ही आणि सिनेविश्वामध्ये तुम्ही आपल्या दर्जेदार कलाकृतीने ठसा उमटविला आहे.
हे माझं भाग्य आहे की, माझा पहिला सिनेमा ‘लपून छपून’मध्ये मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. विनोदासाठी भाषेवर प्रभुत्त्व असणं किती गरजेचं आहे, हे तुम्ही शिकवलंत. विनोदाची अचूक वेळ साधणं, यासाठी गरजेची असलेली वैचारिकता खरंच आमच्या पिढीने तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे.
अनेक सिनेमांमधल्या तुमच्या भूमिकांना विनोदाची झालर असायची. पण प्रत्येक भूमिकेची लकब, संवादफेक, आणि हावभाव यातल्या वैविध्यावर तुम्ही डोळसपणे काम केल्याने तुमच्या विनोदात एकसूरीपणा कधीच जाणवला नाही, हे आमच्यासारख्या आजच्या अभिनेत्यांना शिकण्यासारखं आहे.
तुमच्यावर नेहमीच रसिकांनी विनोदी अभिनेत्याचे शिक्कामोर्तब केले. पण ‘बहुरूपी’, ‘भुजंग’, ‘कळत-नकळत’,’ अरे संसार संसार’, ‘भस्म’ यांसारख्या सिनेमांमधून तुमच्या अभिनयाची एक वेगळी छटा पाहायला मिळाली.
मी तुम्हांला अभिनयातले आणि विनोदातले बादशाह मानतो. तुमची सर दूस-या कोणत्याच अभिनेत्याला येणे शक्य नाही. तुमच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने आपण एकत्र केलेल्या ‘आंधळी कोशींबीर’या दुस-या सिनेमानंतर ‘तुझ्या विनोदाची वेळ चांगली आहे’, ही मला दिलेली दाद कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मला जास्त आनंद देणारी होती.
गेली 50 वर्ष तुम्ही सातत्याने काम करत आहात, जेव्हा कधी मला काम करताना थकायला होतं. तेव्हा मी स्वत:ला प्रोत्साहन देताना तुम्हांला आठवतो. तुमची काम करण्याची उर्जा आणि सातत्य हे माझ्यासाठी नेहमीच आदर्श आहे.