यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजला आहे. यातच अनेकांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागलाय. अशात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. यातून काही बरे झाले तर काहींचा कोरोनाने जीव घेतला. यात तंत्रज्ञांचा देखील समावेश आहे. 'ह्रदयांतर' या मराठी चित्रपटाचे डिओपी दिलशाद पिप्पी यांचं कोरोनाने निधन झालं आहे.
फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी याविषयीची माहिती सोशल मिडीयावर देत भावुक पोस्ट शेयर केली आहे. विक्रम यांची पोस्ट पाहुन अनेकांना धक्का बसला आहे. ह्रदयांतर या चित्रपटातून विक्रम यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. त्यावेळी विक्रम यांना दिलशादची प्रचंड मदत झाली होती.
विक्रम यांनी पोस्टमध्ये लिहीलय की, "माझा पहिला चित्रपट ह्रदयांतरचा दिग्दर्शक म्हणून या माणसासोबत माझ्या प्रवासाला सुरुवात केली होती. मी या सगळ्यात नवीन होतो पण त्याने मला मार्गदर्शन केलं आणि माझा हात पकडून मला रस्ता दाखवला होता. एक हुशार तंत्रज्ञ आणि चांगला माणूस. या वायरसमुळे या सकाळी आम्ही आमचा डिओपी गमावला. खूप छान आठवणी आहेत. फक्त चांगला तंत्रज्ञ नाही तर एका चांगला माणूसही होता. मी हे नेहमीच लक्षात ठेवीन. शांततेत विश्रांती घे मित्रा. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि कायम करत राहू."
दिलशाद यांच्या निधनाने त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांवर शोककळा पसरली आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ह्रदयांतर' या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम फडणीस यांनी केलंय. या चित्रपटात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.