2013 मध्ये आलेल्या 'खो खो' या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या चित्रपटातील आदिमानव प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवने साकारली आहे. या चित्रपटाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने या चित्रपटातील कलाकारांनी सोशल मिडीयावर आठवणींना उजाळा दिला आहे.
'लोचा झाला रे' या नाटकावर आधारित 'खो खो' हा सिनेमा आहे. त्यामुळे या नाटकातही सिद्धार्थने हा आदिमानव साकारला होता. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'खो खो' या सिनेमातील आदिमानवनेही सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. या चित्रपटातील सिद्धार्थचा लुक, हावभाव, वावर, अभिनय यातून त्याचं अभिनय कौशल्य पाहायला मिळालं होतं. या चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे.
सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "लोचा झाला रे नाटकामधील ‘आदिमानव’ खूप गाजला होता. त्याने एक वेगळं नाव,वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. त्याचं सगळं श्रेय केदार सरांनाच जातं आणि त्याच लोच्या झाला रे नाटकावर खो खो सिनेमा बनला आणि हा आदिमानव नाटकाच्या रंगमंचावरून silver screen वर अवतरला. आज या सिनेमाला ८ वर्ष पूर्ण झालीयत...केदार सरांचे मनापासून आभार कारण माझ्या आयुष्यात त्यांनी हा आदिमानव आणला जो अजूनही लहान मुलांच्या तोंडी आहे. मी नेहमीच नशिबवान समजतो की भरत जाधव सरांसारख्या कलाकाराबरोबर मी screen share केलंय आणि ते जेवढे उत्तम कलाकार आहेत तेवढे उत्तम माणूस आहेत. "विजू मामांना" खूप miss करतोय कारण विजय मामांनी खूप गोष्टी शिकवल्या आणि या सिनेमातलं त्यांचं काम अप्रतिम होतं. कमलाकर सातपुते, वरद चव्हाण शाम घोरपडे, क्रांती रेडकर, आनंदा कारेकर सगळीच मंडळी खूप मस्त आणि प्राजक्ता माळीचा पहिला सिनेमा तिचंही अभिनंदन... आज ८ वर्षे झाली या आदिमानवाला... मायबाप रसिकप्रेक्षकांचे आभार कारण पारितोषिकही मिळाली आणि रसिकांचं प्रेमही मिळालं. पण याचं सगळं श्रेय केदार सर आणि भरत सरांना जातं...खूप प्रेम माझी खो खो टीम."
या पोस्टमधून सिद्धार्थने चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेंसह प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.