मराठीसह हिंदीतही आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अष्टपैलू अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. अशोक सराफ हे अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कलाकारांनी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही कलाकारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
अभिनेता सिद्धार्थ जाधवसाठी अशोक सराफ हे महाराष्ट्राचे महानायक आहेत. सिद्धार्थने सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ लिहीतो की, "अशोक सराफ.. "महाराष्ट्राचा महानायक" वाढदिवसाच्या शुभेच्छा अशोकमामा...लहानपणापासून तुमची चित्रपटातली कामं पहात मोठा झालो....तुमच्याबरोबर काम करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं..पण "साडे माडे तीन" या सिनेमाच्या निमित्ताने तेही स्वप्न पुर्ण झालं माझं...मला नेहमीच अभिमान वाटतो कि मी मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहे जिथे "अशोकमामांसारखा महानायक" आहे... मामा ..तुमच्याकडून आम्ही खुप काही शिकलो आणि अजूनही शिकतोय...आमच्यासारख्या कलाकारांवर तुमचे आशिर्वाद असेच कायम रहावेत..एवढीच विनम्र इच्छा...माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि कामय तुमचा आदर आहे."
तेव्हा सिद्धार्थ जाधवचं अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं या पोस्टमधून पाहायला मिळतय.
अभिनेता भरत जाधव यांनीही अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. भरत जाधव यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो शेयर केलाय. भरत जाधव यांनी हिरो म्हणून केलेल्या पहिल्याच सिनेमात त्यांच्यासोबत अशोक सराफ हे सहकलाकार होते. 'चालू नवरा भोळी बायको' या सिनेमाची आठवण भरत जाधव यांनी शेयर केली आहे.
भरत जाधव लिहीतात की, "हिरो म्हणून करिअरचा पहिलाच सिनेमा 'चालू नवरा भोळी बायको' आणि समोर सहकलाकार होते दस्तुर खुद्द अशोक सराफ. सुरुवातीला जाम टेन्शन आल होत पण त्यांनी सहजपणे आपलंसं केलं. जितक्या सहजतेने गेली ४ दशकांहून अधिक त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. त्यांच्याबद्दल लिहावं बोलावं तितकं कमीच आहे. त्यांच्या 'आयत्या घरात घरोबा' सिनेमातला शेवटचा सीन खुप सुंदर आहे. हातातली छत्री गोल गोल फिरवत जाणाऱ्या अशोक मामांकडे बोट दाखवत सचिनजी म्हणतात, " बघितलंस मधुरा, सर्वांच्या आयुष्यात आनंद वाटून जगातला सर्वात मोठा श्रीमंत चाललाय!" खुप खरं आहे ते...अशोक मामा तुमच्या सारखा श्रीमंत माणूस शोधूनही सापडणार नाही."