'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेच्या वेगळ्या विषयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेत नातेसंबंध आणि कुटुंबाची कहाणी पाहायला मिळतेय. अभिनेते मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारतायत. तर अभिनेत्री अर्चना पाटकर या अनिरुद्धच्या आईच्या भूमिकेत आहेत तर अरुंधतीच्या सासूची भूमिका त्या साकारत आहेत. या मालिकेतील आई-मुलाची ही जोडीही प्रसिद्ध आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे कलाकार आई-मुलाच्या जोडीत दिसत असले तर काही वर्षांपूर्वीही या कलाकारांनी एकत्र काम केलय.
मिलिंद गवळी यांचा मराठी चित्रपटसृष्टीतला प्रवास मोठा आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलय. तर अभिनेत्री अर्चना पाटकर यांचीही सिनेकारकिर्द मोठी आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. यापैकीच लक्षवेधी ठरलेला चित्रपट म्हणजे 'सून लाडकी सासरची'. या चित्रपटात अर्चना यांनी सासूची भूमिका साकारली होती. याच चित्रपटात त्यांना दोन मुलं दाखवण्यात आली होती. एका मुलाच्या भूमिकेत झळकले होते अभिनेते समीर धर्माधिकारी तर धाकट्या मुलाच्या भूमिकेत मिलिंद गवळी झळकले होते. 2005 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या चित्रपटात सूनेच्या भूमिकेत झळकल्या होत्या. म्हणजेच तब्बल 16 वर्षांपूर्वी मिलिंद आणि अर्चना पाटकर यांनी एकत्र काम केलं होतं.
'आई कुठे काय करते' या मालिकेतून हे दोन्ही कलाकारांसह इतर कलाकारही त्यांच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत.