आज मराठी सिनेमांमध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. असाच एक नवा विषय प्रेक्षकांसमोर कलादिग्दर्शक, दिग्दर्शक -निर्माते नितिन चंद्रकांत देसाई घेऊन येत आहेत. कथानकाला साजेसे लोकेशन, पात्र तसेच इतर सर्व गोष्टींवर विशेष महत्व देणे यामुळेच त्यांनी मराठीतील दर्जेदार सिनेमांची आजवर निर्मिती केली आहे.‘ट्रकभर स्वप्न’ हा त्यांचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कर्जत येथील एन.डी स्टुडियोमध्ये ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमाचा मुहूर्त पार पडला.‘ट्रकभर स्वप्न’ या त्यांच्या आगामी चित्रपटात देखील आपला हाच वेगळेपणा जपण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करीत आहे. यात मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार असून, अदिती पोहोनकर, मुकेश रिशी, यतीन कार्येकर, स्मिता तांबे आणि सुरेश भागवत हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतील.
प्रमोद पवार दिग्दर्शित ‘ट्रकभर स्वप्न’ हा सिनेमा सामान्य मुंबईकरांच्या भावना आणि त्यांच्या महत्वाकांक्षेवर आधारित आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणारा प्रत्येकजण उराशी एक स्वप्न बाळगतो. जमिनीवर राहून आकाशात उंच भरारी मारण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सामान्य मुंबईकरांच्या भावनांचा वेध घेणा-या या सिनेमाचे लेखन प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.