'जून' या आगामी सिनेमातील 'हा वारा' हे गाणं नुकतच प्रदर्शित झालय. गायिका शाल्मली खोलगडेच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला जितेंद्र जोशीने शब्दबद्ध केलय. या सिनेमातील गाण्यांना शाल्मलीने संगीत दिले असून या सिनेमातून शाल्मली संगीतकार म्हणून पदार्पण करतेय.
हे एक मोंटाज सॉंग असून औरंगाबादमधील अनेक प्रेक्षणीय स्थळे, मार्केट, गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या सिनेमातून अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसतेय.
या गाण्याविषयी शाल्मली म्हणते, '' खरं सांगायचं तर हे गाणे मी गाताना खूपच एन्जॉय केले आहे. मनाला स्पर्श करणारे हे गीत प्रवासादरम्यान सुखद अनुभव देणारे आहे. श्रोत्यांना हे गाणे नक्कीच आवडेल.'' तर या गाण्याबद्दल नेहा आणि सिद्धार्थ सांगतात,'' एखादी व्यक्तिरेखा साकारताना अनेकदा आपण त्यात गुंतून जातो. त्यातही एखादा भावनिक विषय असेल तर आपोआपच आजूबाजूचं वातावरणही नकळत भावनिकच झालेलं असतं. त्यामुळे 'हा वारा' या गाण्याने आम्हाला जरा उत्साही केले. या गाण्यात आम्ही हसतोय, आनंदी आहोत. आमच्यासाठी हा एक ब्रेक होता.''
निखील महाजन दिग्दर्शित 'जून' हा सिनेमा प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.