By  
on  

'फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून' सिनेमाची बाबांना अनोखी भेट 

येत्या 'फादर्स डे'च्या निमित्ताने बाबांना खास भेट म्हणून 'जून' या सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. 'जून' चित्रपटाच्या टीमने सगळ्यांच्याच आयुष्यातील बाबांना फादर्स डेच्या निमित्ताने हे खास गाणं भेट म्हणून प्रदर्शित केलय. 'जून' सिनेमातील 'बाबा' गाण्याचं रिप्राईज व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलय. निखिल महाजन यांचे शब्द असलेल्या या गाण्याला शाल्मलीने संगीत दिलय, तर आनंदी जोशीचा गोड आवाज या गाण्याला लाभलाय.  या गाण्यात नेहा पेंडसे बायस, शाल्मली, आनंदी जोशी, रेशम श्रीवर्धन, अमृता खानविलकर, प्रिया बापट, गिरीजा ओक गोडबोले, मृण्मयी गोडबोले, पर्ण पेठे, गौरी नलावडे, संस्कृती बालगुडे या अभिनेत्री झळकत आहेत. 

या गाण्याविषयी शाल्मली म्हणते की,''आपण अनेकदा वडिलांना द्यायला हवे तितके महत्व देत नाही. मला खूप अभिमान वाटतो, की 'जून'मधील 'बाबा' हे गाणे सोलो फिमेल ट्रॅक असून आनंदी जोशीने खूपच सुंदर गाणं सादर केलं आहे. जेव्हाजेव्हा मी हे गीत ऐकते तेव्हा तेव्हा मी कृतज्ञतेने भारावून जाते. मला खात्री आहे, की अशीच भावना प्रेक्षकांचीही असेल.मला असेही वाटते की हे गाणं ऐकून प्रेक्षक 'जून'शी अधिक खोलवर जोडले जातील.'' या गाण्याविषयी आणि आपल्या बाबांविषयी निर्माती, अभिनेत्री नेहा पेंडसे बायस सांगते,''आयुष्यात भरभराट होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते. जसे सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा, तत्त्वे, मूल्ये हे सगळे गुण माझ्या बाबांमुळेच माझ्यात आले. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे माझ्या बाबांनी या गोष्टी मला कधीच सांगितल्या नाहीत. एकतर ते मितभाषी आहेत. त्यामुळे त्यांच्या कृत्यातून त्या मला समजत गेल्या. मी नेहमीच त्यांना नैतिक मूल्ये जपून आयुष्य भरभराटीला नेताना पाहिलं आहे आणि म्हणूनच ते माझ्यासाठी आदर्श आहेत. मी नक्कीच आईच्या खूप जवळ आहे मात्र मी बाबांसारखी आहे. त्यामुळे 'बाबा' या गाण्यातील बोल आमच्या नात्यासाठी अगदी तंतोतंत जुळणारे आहेत.''

'जून' या सिनेमाचे निर्माता आणि गीतकार निखिल महाजन म्हणतात, '' बाबा हे गाणं अशा व्यक्तीवर आहे ज्यांचे आपल्या आयुष्यात विशेष स्थान आहे. आपल्या आयुष्यातील 'बाबा' या खास व्यक्तीला हे गाणे 'जून' आणि 'प्लॅनेट मराठी'च्या वतीने समर्पित करण्यात येत आहे आणि यासाठी 'फादर्स डे'पेक्षा चांगला कोणता दिवस असूच शकत नाही. सिनेसृष्टीतील सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री 'बाबा' या गाण्याशी जोडल्या गेल्या आहे. त्यामुळे माझ्या या सगळ्या मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानतो, की त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत 'जून'च्या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दलचे प्रेम व्यक्त केले.''

तर या गाण्याविषयी 'प्लॅनेट मराठी'चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ''वडील ही आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहे, जी कधीच आपल्यासमोर व्यक्त होत नाही. प्रेम, माया, राग, तडजोड, आनंद, दुःख अशा सगळ्याच भावना व्यक्त न करता, मनात साठवून ते आपल्या घराचा आधारस्तंभ बनतात. प्रसंगी कणखरपणे आपल्या पाठीशी उभेही राहतात. अशा सगळ्याच 'बाबां'ना फादर्स डेच्या निमित्ताने हे गाणे समर्पित करण्यात आले आहे."  

 सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित 'जून' या चित्रपटात नेहा पेंडसे  बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive