बॉलिवूडमध्ये नवीन चेहरे लॉन्च करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारा भाईजान सलमान खान इंडस्ट्रीत आता आणखी एक नवा चेहरा लॉन्च करणार आहे. एकीकडे अनेक सुपरहीट सिनेमे देत तो अनेक नव-नवीन कलाकारांना संधी देतोय. आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, झरीन खान, अथिया शेट्टी, सूरज पांचोली यासारख्या अनेक नवोदितांना सलमानने इंडस्ट्रीत आणले आहे. सलमान खान आपल्या प्रोडक्शनच्या सिनेमासाठी नवीन चेह-याच्या शोधात होता आणि मिडीया रिपोर्ट्सनुसार हा नवा चेहरा त्याला मिळाला आहे. खास मित्र आणि अभिनेता मोहनीश बहल याची मुलगी प्रणुतन बहल हिला तो बॉलिवूडमध्ये लवकरच लॉन्च करतोय.
अभिनेता मोहनीश बहल याची मुलगी आणि प्रसिध्द अभिनेत्री नुतन यांची नात आहे. बरेच दिवस सलमान आपल्या आगामी सिनेमासाठी फ्रेश टॅलेंटच्या शोधात होता. बॉलिवूडची पार्श्वभूमी नसलेला जहीर इकबाल या सिनेमाद्वारे डेब्यू करतोय. याची माहिती खुद्द सलमाननेच आपल्या सोशल अकाऊंटद्वारे दिली होती. मिडिया रिपोर्ट्सनुसार जहीर एका प्रसिध्द ज्वेलर्सचा मुलगा आहे.
मागच्याच वर्षी प्रणुतनने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आतुर असल्याची इच्छा व्यक्त केली होती. लवकरच प्रणुतनची ही इच्छा पूर्ण होत आहे. ब-याचवेळा आजी नुतनसह प्रणुतनची तुलना करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांनाच तिच्या पदार्पणाची उत्सुकता राहिल.
सलमान खान आपल्या प्रोडक्शनच्या नव्या सिनेमासाठी प्रणुतनच्या नावाची अधिकृत घोषणा केव्हा करतो, याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.