अभिनत्री मृण्मयी देशपांडे विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यानंतर आता मृण्मयीची बहिण गौतमी देखील मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख बनवताना दिसतेय. तिच्या अभिनयानं गौतमीने मनोरंजन क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलय. या दोघी बहिणी एकत्र झळकल्या नसल्या तरी सोशल मिडीयावर या रियल लाईफ बहिणींची जोडी लोकप्रिय आहे. दोघी अनेकदा त्यांचे गाण्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करतात. दोघींनाही गाण्याची आवड असल्यामुळे दोघींचा सुरेल आवाज लक्षवेधी ठरतो. मात्र सध्या एका वेगळ्याच व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलय.
हा व्हिडीओ आहे मृण्मयी देशपांडेचा. या व्हिडीओत मृण्मयी मोठ्या बहिण म्हणून व्यथा मांडताना दिसतेय. एवढच नाही तर बहिण गौतमीला चक्क चोर म्हणतेय. गौतमी अजूनही सुधरली नाहीये असं लिहीत मृण्मयीने हा व्हिडीओ केलाय. गौतमीच्या घरी जेव्हा मृण्मयी तिचं कपाट आवरत होती त्यावेळी मृण्मयीला तिचे हरवलेले काही कपडे गौतमीच्या कपाटात सापडले आणि ही व्यथा मांडणारा हा मजेशीर व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत मृण्मयी म्हणते की, "मी आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडायला हा व्हिडीओ करतेय. मी गौतमीच्या घरात आहे आणि मी गौतमीचं कपाट लावतेय. मला सांगायला खूप आनंद होतोय. आत्तापर्यंतचे माझे हरवलेले कपडे मला मिळाले.त्या कपड्यांचे बोळे करुन लपवण्यात आले होते. मी जेव्हा तिला विचारलं होतं गौतू माझे हे टॉप्स चुकून तुझ्याकडे आले आहेत का. तर नाही ताई असं सरळ उत्तर देण्यात आलं होतं. आणि त्या कपाटामध्ये माझे सगळे कपडे लपवून ठेवले होते. तुम्ही ज्या सईवरती प्रेम करता ती सई चोर आहे."
माझा होशील ना या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली सई उर्फ गौतमी देशपांडे ही चोर असल्याचं तिची बहिण मृण्मयी या व्हिडीओतून सांगतेय. हा मजेशीर व्हिडीओ पसंत केला जातोय.