मराठी मनोरंजन विश्वात आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक सिनेमे पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा काही ऐतिहासिक सिनेमे आगामी काळात पाहायला मिळणार आहेत. यापैकीच एक म्हणजे 'बलोच' हा सिनेमा. पानिपत लढाईनंतर या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'बलोच' या सिनेमाचा टिझर पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. या सिनेमात अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांची मुख्य भूमिका आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या सिनेमाची कथा ही प्रकाश जनार्दन पवार यांचीच आहे.
या नव्या टिझर पोस्टरमध्ये पिळदार मिशा, करारी मुद्रा, डोळ्यात धगधगती आग असलेले प्रवीण तरडे दिसत आहेत. त्यांचा हा रांगडा अवतार नजरा खिळवून ठेवणारा आहे. जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माता महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.