आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज सगळीकडे विठू नामाचा गजर सुरु आहे. आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी खास नृत्याविष्कार सादर केला आहे.
'अमृत कला'च्या माध्यमातून अमृता ही आशिष पाटीलसोबत विविध नृत्याविष्कार सादर करताना दिसतेय. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या अमृताची उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळख आहे. याच नृत्यप्रेमाचं रुपातंर करत 'अमृत कला'च्या माध्यमातून अमृता नृत्य सादरीकरण करतेय. आषाढी एकादशीच्या निमित्तानेही अमृताने असाच एक खास व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.
नृत्याची हीच कला अमृता आणि आशिषने विठूमाऊलीच्या चरणी समर्पित केली आहे. 'लय भारी' सिनेमातील 'माऊली माऊली' या अजय-अतुल यांच्या प्रसिद्ध गाण्यावर सुंदर नृत्य सादर करत या दोघांनीही विठ्ठलाच्या चरणकमली नृत्याविष्कार समर्पित केला आहे.
अमृताने आजवर विविध मराठी आणि हिंदी डान्स रिएलिटी कार्यक्रमाच्या माध्यमांमधून नृत्य सादरीकरण केलय. विविध डान्स रिएलिटी शोमध्ये स्पर्धक, सुत्रसंचालक ते परिक्षक असा प्रवास तिने केलाय. तर नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आहे. आशिषने अनेक रिएलिटी शो, सिनेमे आणि पुरस्कार सोहळ्यांसाठीही नृत्यदिग्दर्शन केलय. त्यामुळे अमृता आणि आशिषची ही जोडी त्यांच्या नृत्याविष्कारातून विविध डान्स व्हिडीओमधून कमाल करताना दिसत आहे.