चित्रपटाच्या सेटवर थोडक्यात बचावले अभिनेते मिलिंद शिंदे, टळला मोठा अपघात

By  
on  

'जयंती' या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरु होते. या चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली. यावेळी मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले असून मोठा अपघात टळला आहे.

अभिनेते मिलिंद शिंदे हे त्यांच्या भूमिकेचा सराव करण्यात मग्न होते. तर दुसरीकडे सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉट च्या चित्रीकरणाचा सराव करत होती. यावेळी एका सीनसाठी सीनसाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती. या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेनच्या दिशेने उभे होते हे समजलं नाही. 

जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली. नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें काही सेकंदातच खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा अपघात टळला. सेटवर घडलेल्या या घटनेत सुदैवाने मिलिंद शिंदे यांना काही दुखापत झाली नाही.

या प्रसंगाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे सांगतात, "एखादं चांगकलं काम आपल्या हातून घडत असेल तर तेव्हा संकटाची सावलीदेखील आपल्यावर पडत नाही...! अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेच्या तयारीत रमून गेलो होतो, रात्रीच्या समयी माझ्या आजूबाजूला चालत असलेल्या गोष्टीदेखील मला त्या क्षणासाठी दिसल्या नाहीत मग ती मोठी जिमी जीब का असेना...! मी त्यावेळी जर झुकलो नसतो तर त्या लोखंडी जिमी जीबच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती, पण सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटलंदेखील नाही. सेटवर लोकांनी वेळीचं दाखवलेल्या प्रसंगावधामुळे माझा जीव वाचला....! मी जरी माझ्या कामात रमलो असलो तरी सेट वरील प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केलं याचं मला कौतुक वाटतं."

मिलिओरिस्ट फिल्म्स स्टुडिओ निर्मित तसेच शैलेश नरवाडे दिग्दर्शित जयंती हा एक ऍक्शन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येण्यासाठी सज्ज होत आहे.

Recommended

Loading...
Share