सिरीजचं नाव – आणि काय हवं ? 3
कलाकार – उमेश कामत, प्रिया बापट
लेखक – वरुण नार्वेकर
दिग्दर्शक – वरुण नार्वेकर
कुढे पाहता येईल - एम एक्स प्लेयर
रेटिंग - 3 मून्स
पती-पत्नीच्या सहजीवनात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. या नात्यात काही वर्षे लोटली की मग नातं घट्ट टिकून रहावं यासाठी काय हवं ? तर त्याचं उत्तर ‘आणि काय हवं 3’ ही वेब सिरीज. वरुण नार्वेकर लिखीत – दिग्दर्शित या वेब सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या अशा यशस्वी सिझननंतर आता या सिरीजचं तिसरं सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलय.
सिरीजच्या पहिल्या दोन सिझनप्रमाणे ही कथा जुई आणि साकेत या जोडप्याची आहे. मात्र लग्नाच्या पाच वर्षांनंतरही या नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी जुई आणि साकेत प्रत्येक टप्प्याला एकमेकांना कसे समजुन घेतात याची गंमत यंदाच्या पर्वात आहे. जुई – साकेतच्या लग्नाला पाच वर्षे लोटली असली तरी हे जोडपं नात्याला ताजेपणा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. विविध टप्प्यांवर जुई आणि साकेत कोणते निर्णय घेतात, गंभीर गोष्टींना कसे हाताळतात, धकाधकीच्या आयुष्यातही एकत्र आल्यावर नात्याला जपून कशी एकमेकांची काळजी घेतात हे या सिरीजमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरतय.
पहिल्या दोन सिझनप्रमाणे अभिनेता उमेश कामत हा साकेतच्या तर अभिनेत्री प्रिया बापट ही जुईच्या भूमिकेत झळकतेय. खऱ्या आयुष्यातील हे जोडीदार जेव्हा या भूमिकांच्या निमित्ताने जोडीदाराची भूमिका साकारतात ते पाहायला मजा येते. ही गोड जोडी मुळात प्रेक्षकांची आवडती असल्याने त्यांना या सिरीजच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र पाहणं रंजक ठरतं.
साकेतच्या भूमिकेतील समजुतदारपणा, वेडेपणा आणि त्याला अवगत असलेली जुईला हसवण्याची कला या सगळ्या गोष्टी अभिनेता उमेश कामतने उत्तम सादर केल्या आहेत. साकेतच्या व्यक्तिरेखेतील निरागसता आणि वेळ पडल्यास त्याच्यातील जबाबदारीपण त्याच्या हावभावातून आणि संवादातून जाणवतं. तर राग आणि प्रेम हे दोन्ही भाव असणारी जुई ही अभिनेत्री प्रिया बापटने उत्त्तम साकारलीय. जुईच्या भूमिकेतील तिचा अभिनय लक्षवेधी ठरतो. त्यांना पाहुन तिसऱ्या सिझनमध्येही पहिल्या आणि दुसऱ्या सिझमधील साकेत-जुईचे प्रसंग आठवत राहतात.
यंदाच्या सिझनचा महत्त्वाचा भाग म्हणजे सिरीजच्या विविध भागांमधील वैविध्यपूर्ण विषय. या सिरीजच्या एका भागात स्त्रियांची मासिक पाळी आणि या दरम्यान असलेलं जोडप्यांचं नातं हे दाखवण्यात आलय. अशा अवस्थेत साकेत जुईची कशी काळजी घेतो हे पाहताना एक आदर्श पति समोर दिसतो तर साकेतच्या आयुष्यातील अडथळ्यांवर उपाय शोधणारी जुई एक आदर्श पत्नी म्हणून समोर येते. तर काही मजेशीर विषय चेहऱ्यावर आपसुकच हसू आणतात.
जुई आणि साकेतच्या नात्यातील वेडेपणा, आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन आणि विविध प्रसंग वरुण यांनी त्यांच्या लेखणीतून सुंदर उतरवलेत. जुई आणि साकेतमधील संवाद आणि विविध प्रसंग हे अगदी सहज सुंदर चित्रीत झाल्यानं ते अगदी खरेखुरे वाटतात.
कॉमेडी, महत्त्वाचे विषय, भावुक सीन आणि जुई – साकेतची क्रेझी जोडी या सिरीजचं महत्त्वाचं आकर्षण आहे. या सिरीजचे एकूण सहा भाग आहेत. मात्र प्रत्येक भागाचा कालावधी किंवा भागांची संख्या आणखी वाढवली असती तर जई – साकेतच्या नात्यातील आणखी किस्से पाहायला मजा आली असती.
वरुण नार्वेकर यांच्या दिग्दर्शनातून आणि लेखणीतून समोर आलेल्या जोडप्याच्या नात्यातील या कथा ही सिरीज पाहणाऱ्या प्रत्येक जोडप्यासाठी प्रेरणादायी ठरतील एवढं नक्की. तर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका ठरेल कारण प्रिया आणि उमेशच्या कमाल केमिस्ट्रीने या सिरीजमध्ये बहार आणलीय.