By  
on  

पाहा Trailer : 'बाप बीप बाप'मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता ?

वडील -मुलाचे नाते हे अनेकदा तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नातं असतं, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी 'बाप बीप बाप' वेबसीरिज प्रदर्शित होत आहे. अमित कान्हेरे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, पर्ण पेठे, तेजस बर्वे, उदय नेने हे मुख्य भूमिकेत आहेत. 
 
नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून वडील - मुलाचे अवघड नाते यात दिसत आहे. लॉकडाऊन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाऊनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते? या काळात नात्यातील संवाद गवसतो का? त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'बाप बीप बाप' मध्ये मिळणार आहेत.

अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रणाची धुरा विशाल सांघवाई यांनी सांभाळली आहे. 

येत्या 31 ऑगस्ट रोजी ही सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive