राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला असला तरी कोरोना रुग्ण आणि कोरोनाने होणारे मृत्यू काही थांबलेले नाही. त्यामुळे कोरोनापासून अद्याप पूर्णपणे बचाव झालेला नाही. समान्य नागरीकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही कोरोनाची लागण झाल्याचं चित्र पाहायला मिळतय.
मनोरंजन क्षेत्र आणि राजकारणात सक्रिय असलेले अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नुकतीच कोरोनाची लागण झालीय. सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांनी याविषयी माहिती दिलीय. कोरोनाचं संकट अद्याप टळले नसल्याचं ते या पोस्टमध्ये म्हणतात.
अमोल कोल्हे यांनी लिहीलय की, "कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे."
तेव्हा लवकरच अमोल कोल्हे कोरोनातून बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांचे चाहते या पोस्टच्या कमेंट्समध्ये करताना दिसतायत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारण्यासाठी अमोल कोल्हे यांची खास ओळख. या भूमिकांमधून त्यांनी महाराजांचा इतिहास मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आणला. शिवाय राजकारणातही ते उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत.