विविध जाहीरातींमधून अनेकदा महत्त्वाचे विषय मांडले जातात. अशीच एक जाहीरात सध्या चर्चेचा विषय ठरलीय. ज्यात सिस्टर्स म्हणजे नर्सच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांसह नर्सेसनीही मोठी कामगीरी केलीय. यातच ही नवी जाहीरात त्यांच्या कार्याला सलाम करतेय.
या जाहीरातीत अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री निर्मिती सावंत झळकतायत. सध्या ही जाहीरात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलीय. जीवशैली प्रशिक्षक गौर गोपाल दास यांनी देखील सोशल मिडीयावर ही मराठी जाहीरात शेयर करत याचं कौतुक केलय. या जाहीरातीत सिद्धार्थ आणि श्रद्धा या जोडप्याला झालेल्या बाळाचं बारस दाखवण्यात आलय. ज्यात दोघही एका आशाताई नावाच्या व्यक्तिची वाट पाहतायत. या आशाताई म्हणजे नर्स ज्यांनी श्रद्धाच्या डिलिव्हरी दरम्यान बाळ आणि तिचा सांभाळ केला आणि त्यांची काळजी घेतील. म्हणूनच याच आशाताईंच्या हस्ते बाळाचं नाव ठेवून त्याचं बारसं करण्याचा निर्णय श्रद्धा आणि सिद्धार्थ घेतात.
या जाहीरातीला मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद पाहुन स्पृहाने सगळ्यांचे आभार मानणारी पोस्ट शेयर केली आहे. ती लिहीते की, "आवडत्या माणसांबरोबर मनापासून काम केलं की ते चांगलंच होतं."
क्षितिज पटवर्धन यांनी या जाहीरातीसाठी लेखन केलं असून नितीश पाटणकर यांनी दिग्दर्शन केलय. मराठीसह इतर भाषीयांनीही या जाहीरातीला पसंती दर्शवली आहे. या जाहीरातीचा विषय लक्षवेधी ठरतोय.