By  
on  

"अण्णा तुमची खुप आठवण येते" म्हणत या कलाकारांनी दिला विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा

प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. याचनिमित्ताने लोकप्रिय अभिनेते भरद जाधव आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी विजय चव्हाण यांच्या खास आठवणी सोशल मिडीयावर शेयर केल्या आहेत.

केदार शिंदे यांची विजय चव्हाण यांच्यासोबतचं खास मैत्रीपूर्ण नातं होतं. म्हणूनच त्यांच्या आठवणीत केदार यांची भावुक पोस्ट पाहायला मिळतेय. ते लिहीतात की, "कठीण आहे तू सोबत नाहीस हे मान्य करणं... पण खात्री आहे की, जिथे असशील तिथलं वातावरण आनंदी असणार..." या पोस्टसोबत केदार यांनी विजय चव्हाण यांच्यासोबतचा एक फोटोही शेयर केलाय. या फोटोत अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरही पाहायला मिळतेय. 

तर अभिनेते भरत जाधव यांनीही विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. विजय चव्हाण यांच्यासोबतचा फोटो शेयर करत ते लिहीतात की, "बाप ज्या प्रमाणे बोट धरून आपल्या मुलाला शिकवतो त्याला घडवतो, तसा माझ्या आयुष्यातील बाप माणूस म्हणजे विजय चव्हाण. आज मी जो काही डाऊन टू अर्थ आहे, नम्र आहे, वेळेच्या बाबतीत शिस्तबद्ध आहे ते केवळ विजू मामांमुळे. मी स्वतःला नशिबवान समजतो की करिअर च्या योग्य वळणांवर मला विजू मामांसारखी माणसं भेटली. विजू मामांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. ते एक कलाकार म्हणून - माणूस म्हणून ग्रेट होतेच पण त्यांच्याविषयी मला विशेष आत्मियता वाटण्याचं कारण म्हणजे लालबाग- परळ , गिरणगावाशी जोडलेली त्यांची नाळ.आम्ही एकत्र खुप काम केलंय. श्रीमंत दामोदर पंत नाटकात अनेक ठिकाणी दामोदर पंत त्यांच्या मुलावर (विजू मामांवर) हात उचलतात एवढा मोठा सिनिअर नट पण त्यांनी कधीही आढे वेढे घेतले नाहीत की हे खुप जास्त होतंय वगैरे. उलट ते म्हणायचे दिग्दर्शकाला जे योग्य वाटतंय ते करा."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

भरत जाधव पुढे लिहीतात की, "मध्यंतरी सुयोग संस्थे तर्फे मोरूची मावशी साठी मला विचारणा झाली मी विजुमामांना फोन केला की मी करू का ते म्हणाले 'तूच कर..!'मावशी साठी मला तालीमही खुद्द विजू मामांनीच दिली. पहिल्या प्रयोगाचा नारळ ही त्यांच्या हस्तेच फोडण्यात आला. आणि पहिल्या प्रयोगापासूनच मोरूची मावशीलाही हाऊसफुल्ल रिस्पॉन्स मिळू लागला. तो मी विजू मामांचा आशीर्वाद समजतो.मोरूची मावशी सोबतच असंख्य चित्रपटांमधून आपल्या विनोदाची छाप मराठी रसिकांवर सोडलेला हा माणुस इतका नम्र कसा.. कधीकुणा बद्दलही वेड वाकडं बोलणं नाही, सदैव आजूबाजूला प्रसन्न वातावरण ठेवणं, सर्वांच्या कलेने घेणं हा अनुभव विजू मामांच्या बाबतीत अनेकांना आहे. मराठी सिने सृष्टीतील पहिली व्हॅनिटी व्हॅन ज्यावेळेस मी घेतली तेंव्हा त्यात पहिल्यांदा मेकअप विजू मामांचा केला. मराठी नटाकडेही आता मेकअप व्हॅन आहे याचा त्यांना खुप आनंद झाला होता. एकदा एका नाटकाच्या वेळी चालू प्रयोगात मी हसलो होतो तेंव्हा त्यांनी एक मोलाचा सल्ला दिला होता की 'भरत आपण हसायचं नाही, रसिकांना हसवायचं आहे.' अण्णा तुमची खुप आठवण येते..! - दामू."

भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी अनेक प्रोजेक्टच्या निमित्ताने विजय चव्हाण यांच्यासोबत काम केलय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive