अभिनय, नृत्यकौशल्य, अदाकारी आणि सौंदर्य याचा मिलाप असलेली धकधक गर्ल सुपरस्टार माधुरी दीक्षितला गायनाची देखील आवड आहे. अनेक वर्षांपासूनची ही आवड माधुरीने अखेर गाणं स्वरुपात समोर आणली ती 2020 मध्ये. लॉकडाउनच्या काळात कॅन्डल या गाण्यातून तिने आशेचं किरण दाखवणारं प्रेरणादायी गाणं गायलं होतं. या गाण्याच व्हिडीओही प्रदर्शित करत माधुरीने गायन क्षेत्रात पदार्पण केलं. आधीपासूनच गायनाची आवड असलेल्या माधुरीचे पति आणि मुलांनाही संगीताची आवड आहे.
माधुरीने मागील वर्षी प्रदर्शित केलेलं कॅन्डल हे गाणं इंग्रजीत गायलं होतं. यावर पिपींगमूनने माधुरीने नुकत्याच एका लाँच सोहळ्यात प्रश्न विचारला. माधुरी मराठीतही गायन करेल का या प्रश्नाचं उत्तर यावेळी माधुरीने दिलं.
माधुरी म्हणते की, "मुंबईत राहिल्यामुळे तुमचं शिक्षण कॉन्वेन्टमध्ये होतं बहुदा. विचार करण्याची प्रक्रिया ही इंग्रजीमध्ये असते. घरात कायम मराठीच बोलत आलोय. मुलांबरोबर पण मी मराठीतच बोलते. मला मराठीत गायला आवडेल. पण मला असं वाटतं की माझा आवाज इंग्रजीत चांगला वाटतो. पण मी मराठी गाणं नक्की गाईन. नक्की गाऊन बघीन मराठी गाणं आणि बघेन की माझा आवाज बरोबर वाटतो का. जर चांगला वाटला तरच रिलीज करेल."
तेव्हा आगामी काळात माधुरीचा सुरेल आवाज मराठीतही ऐकायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.