सोशल मिडीयाचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. मात्र यात काही तोटेही पाहायला मिळतात. ट्रोलींग करणं, अनधिकृत अकाउंट सुरु करणे आणि मुलींना अश्लील मेसेज पाठवण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याचाच सामना एका मराठी अभिनेत्रीला करावा लागलाय. मराठी बिग बॉस फेम आणि टेलिव्हिजन स्टार वीणा जगतापला एका ट्रोलरने अश्लील मेसेज पाठवून हैराण केले होते. त्यानंतर काही मेसेज त्या अज्ञात व्यक्तिने डिलीट केले.
हा सगळा प्रकार शिव ठाकरेच्या लक्षात येताच वीणाचे फॉलोवर्स आणि शीवने मिळून या ट्रोलरला चांगलाच धडा शिकवलाय.
अशा प्रकारचे अश्लील मेसेज पाठवून आपल्याला कुणीही काहीही करणार नाही असा गैरसमज आता अशा ट्रोलर्सनी दूर करावा अशी पोस्टही वीणाने शेयर केली होती. त्यानंतर ही पोस्ट तिने डिलीट केली.
मात्र शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर याच ट्रोलरचा व्हिडीओ पोस्ट केलाय. शिव या पोस्टमध्ये लिहीतो की, "मुलींवर काहीही कमेंट कराल आणि त्याची कोणीही दखल घेणार नाही हा गैरसमज डोक्यातून काढुन टाका. अवघ्या एका तासात सगळी माहिती मिळवली म्हणजे विचार करा. परत असंं काही झाल्यास त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील. असे वाईट कृत्य करण्यापेक्षा भरपुर शिकुन आई बाबांचं नाव मोठं कर."
शिवने पोस्ट केलेल्या व्हिडीओमधून हा ट्रोलर मुलगा पोलीसांच्या स्वाधीन केल्याचं पाहायला मिळतय. शिवाय व्हिडीओत तो वीणाची माफी देखील मागताना दिसतोय.
शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेता आहे. त्याने याआधी रोडीज या शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तर वीणा जगतापने आत्तापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलय. वीणा देखील मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये झळकली होती. तर 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून ती लोकप्रिय ठरली. 'आई माझी काळुबाई' या मालिकेतही तिने मुख्य भूमिका साकारलीय.