गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा सुरेल आवाज पुन्हा प्रेक्षकांना मंत्रमुग्न करणारेय. कारण वयाच्या 88 व्या वर्षी आशा भोसले यांनी एका मराठी चित्रपटासाठी आपला आवाज दिलाय. लेखक, दिग्दर्शक महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी 'हवाहवाई' चित्रपटासाठी आशाताईंनी गाणं गायलय.
या चित्रपटातील एक उडत्या चालीचं गाणं आशाताईंनी गायलं असून, या निमित्ताने त्यांनी बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलय.
'हवाहवाई' या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या "जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची...' असे शब्द असलेलं हे गाणं आहे.
बऱ्याच वर्षांनी आशाताईंनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायल्यानं स्वाभाविकपणे या गाण्याविषयी आणि महेश टिळेकर दिग्दर्शित 'हवाहवाई' चित्रपटाविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
मल्टीस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात काही नवीन कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे.