गायिका शाल्मली खोलगडेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. शाल्मलीन तिचा बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत लग्न केलं असून नुकताच दोघांचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. 22 नोव्हेंबर रोजी दोघांनी राहत्या घरीच साध्या पद्धतिने विधी करून लग्नसोहळा केला. त्यानंतर मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दोघांचा रिसेप्शन सोहळा नुकताच पार पडलाय.
यावेळी अनेक कलाकारांनी या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी लावली होती. अभिनेत्री अमृता खानविलकर ही पती हिमांशूसोबत या रिसेप्शन पार्टीत हजर होती.
तर सारंग साठ्ये, निखील महाजन यासह अनेक कलाकार यावेळी रिसेप्शन पार्टीत हजर होते. सोशल मिडीयावर या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. यावेळी शाल्मलीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
फरहान शेख हा साउंड डिझायनर आहे. शाल्मली आणि फरहान हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या दिवशीच दोघांनी साखरपुडाही केलाय. दोघांच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.