टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका, विविध कार्यक्रम पाहायला मिळतात. विविध वाहिन्यांच्या गर्दीत अनेक कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातच एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सामान्य लोकांना माहिती नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही सेलिब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ज्या प्रेक्षकांना माहिती नाहीत अशा गोष्टी आणि त्यांच्या किस्स्यांचा फड यात रंगणार आहे. अगदी शाहरुखपासून शरद केळकरपर्यंत, सुनील गावस्करपासून ते सुनील बर्वेंपर्यंत, त्यांच्या व्हॅनिटी, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यांपासून ते लग्नापर्यंत सगळे किस्से यात ऐकायला मिळतील.
अशाच अतरंगी किस्स्यांची मैफल या कार्यक्रमात रंगणार आहे ज्याचं नाव आहे "हे तर काहीच नाय!". यात विशेष अतिथी म्हणून दिसेल अभिनेता सिद्धार्थ जाधव, तर सैराट फेम तानाजी गलगुंडे आणि तुझ्यात जीव रंगला फेम पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर दिसणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षया प्रथमच सूत्रसंचालन करताना दिसेल. सोबतच या कार्यक्रमातून अनेक सरप्राईज पाहायला मिळतील.
येत्या 10 डिसेंबरपासून हा कार्यक्रम शुक्रवार आणि शनिवारी झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.