प्रेमात पडल्यावर सतत त्या व्यक्तिला भेटण्याची हूरहूर मनाला लागते. आपल्याला ज्या व्यक्तिबद्दल खास ‘फिलींग्स’ आहेत, ती व्यक्ती फक्त आपलीच व्हावी, ह्यासाठी नानाविध गोष्टी प्रेमवीर करत असतात. आणि त्या प्रेमातल्या ‘केमिकल लोच्या’मुळे मग ब-याच गंमती-जमतीही आयुष्यात घडतात. यावरच ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमा आधारित आहे.
‘हृदयात समथिंग समथिंग’ चा फर्स्ट लुक सोशल मीडियावरून लाँच झाला. फर्स्ट लुक पोस्टर लाँच झाल्यावर सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणाले, “ प्रेमात पडल्यावर प्रत्येकाच्याच ‘हृदयात समथिंग समथिंग’ होतं. आयुष्यात एकदा तरी ह्या फिलींगची अनुभूती प्रत्येकानेच घेतलेली असते. तुम्ही प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीला इम्प्रेस करता-करता काही विनोदी घटना तुमच्या आयुष्यात घडल्या तर काय धमाल येते, यावर हा सिनेमा बेतला आहे.”
दिग्दर्शक प्रविण राजा कारळे सिनेमाविषयी सांगतात, “हा धमाल विनोदी कौटुंबिक सिनेमा आहे. अनिल कालेलकर ह्यांनी लिहीलेल्या संवादांमुळे तुम्ही सिनेमा पाहताना सतत हसत राहाल, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. ब-याच कालावधीत मराठी सिने इंडस्ट्रीत असा विषय सिनेरसिकांच्या समोर आला नाही. सिनेमा प्रेमाविषयी असला तरीही कुटूंबातल्या 90 वर्षांच्या आजीपासून ते 9 वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे.
पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण,आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला व प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2018ला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.