लहान मुलांचे भावविश्व उलगडण्यासोबतच त्याला वास्तवाची जोड देणारा ‘पिप्सी’ हा सिनेमा मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. साहिल जोशी आणि मैथिली पटवर्धन या दोन बालकलाकारांनी सिनेमात अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. विधी कासलीवाल यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून सौरभ भावे लिखीत या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहन देशपांडे यांनी सांभाळली आहे. ‘बॉटल फुल ऑफ होप’ अशी आकर्षक टॅगलाईन या सिनेमाची आहे. हा सिनेमा आणि यातील कलाकार राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
‘पिप्सी’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंर तो जास्तीत जास्त लहान मुलांना पाहता यावा, यासाठी निर्मात्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ‘फिल्मशाळा’, असं या उपक्रमाचं नाव असून या अंतर्गत विविध स्पर्धासुध्दा आयोजित करण्यात येत आहेl.
फिल्मशाळा अंतर्गत ‘पिप्सी’ हा सिनेमा महाराष्ट्रील सर्व शाळांच्या जवळ असलेल्या थिएटरमध्ये हा विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. तसंच या सिनेमाच्या टिमशी संवांद साधण्याची संधीसुध्दा विद्यार्थ्यांना यावेळेस मिळणार आहे.
‘फिल्मशाळा’ तर्फे नुकतंच मुंबई उपनगरातील एका थिएटरमध्ये ‘पिप्सी’चे स्क्रिनींग झाले, यावेळी जवळपास 500 शालेय विद्यार्थी आणि एनजीओ संस्थांनी उपस्थिती लावून सिनेमाला भरघोस प्रतिसाद दिला. या सर्वांना यावेळी साहिल आणि मैथिली या बालकलाकारांना भेटण्याची संधी मिळाली व संवांदही साधता आला.
या अनोख्या उपक्रमाबद्दल निर्मात्या विधी कासलीवाल म्हणाल्या, “विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि यापैकी अनेकांना सिनेमात करिअर करण्याची इच्छा असते. म्हणूनच सिनेमाला जाणून घेता यावं, हा या उपक्रमागचा उद्देश आहे. हा उपक्रम फक्त ‘पिप्सी’ सिनेमापुरता आम्ही मर्यादित ठेवत नसून दरवर्षी एका नवीन सिनेमाद्वारे विध्यार्थ्यांच्या भेटीला येण्याचा आमचा प्रयत्न असेल.”