गानकोकिळा लता मंगेशकर यांना जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला जातोय. मानवी सृष्टीतील अविस्मरणीय चमत्कार असलेल्या लतादीदी यांंचं आज निधन झालय. दीदींच्या निधनाने देशभरात शोकाकुळ वातावरण आहे. अनेक गायक - गायिकांसाठी लतादीदी या देवस्थानी आहे. गायक रोहित राऊतला लता दीदींनी दिलेला एक सल्ला त्याच्या करियरमधील महत्त्वाचं योगदान ठरलं. पिपींगमून मराठीशी बोलताना रोहितने सारेगमप कार्यक्रमाच्यावेळी लतादीदींसोबत झालेल्या भेटीविषयी सांगितलं.
रोहित सांगतो की, "खरंतर अजुनही विश्वास बसत नाही या गोष्टीवर. आता खिडकीतून बाहरे बघताना वाराही थांबलाय असं वाटतय. कुणीच काहीच कुणाशी बोलत नाहीय. निशब्द करणारी भावना आहे. माझ्या आयुष्यातला क्षण, आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा ज्यामुळे मी आहे तो म्हणजे लता दीदींची भेट. जेव्हा सारेगमपच्या वेळी लता दीदींशी भेट झाली होती. तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारताना खूप काही शिकायला मिळालं. आम्ही शांतपणे ऐकत होतो लतादीदी आम्हाला सांगत होत्या शिकवत होत्या. त्यातील एक गोष्ट मला आजही आठवते. त्यांनी सांगितलं होतं की तुचमं वय वर्षे 13 आहे तर तुमचा आवाज हळूहळू बदलणार या क्षणांना तुम्ही जेवढा रियाज कराल तर पुढचं करियर सुंदर होईल. प्लेबॅक सिंगर व्हायचं असेल तर आत्ता शोज थांबवा. ती गोष्टी मला आणि बाबांना पटली होती. आम्ही मग शोज नाही केले. सलग गाण्याचा रियाज केला. त्यामुळे जे काही आहे ते आहे. काहीही झालं तरी माझं एकच गाणं आहे ते आवडतं आहे. 'सौदागर' मधील तेरा मेरा साथ रहे हे गाणं."
रोहित पुढे म्हणतो की, "आयुष्यातील कुठलाही असा क्षण नाही ज्यावर लतादीदींचं गाणं नसेल. प्रत्येकाच्या आयुष्यातील ती गोड आजी आहे जी प्रत्येकवेळी आपल्याला गोष्ट सांगते. आपली लाडकी गानसम्राज्ञी या आपल्याला सोडून गेल्या देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो."