के.के मेनन यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी आपल्या भूमिकांना नेहमीच योग्य न्याय देत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता के. के. मेनन यांच्या अभिनयाची जादू लवकरच मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेते लोकेश गुप्ते यांच्या ‘एक सांगायचंय..अनसेड हार्मेनी’ या सिनेमाद्वारे के.के मराठीत पदार्पण करत आहे.
अभिनेते लोकेश गुप्ते यांचा दिग्दर्शनातील हा पदार्पणाचा सिनेमा आहे. या मराठी सिनेमाबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत के.के म्हणाले, “अद्याप कधीही प्रकाशझोतात न आलेल्या सामाजिक विषयावर हा सिनेमा बेतला आहे. सिनेमाच्या विषयाला मी नेहमीच महत्त्व देतो. प्रादेशिक भाषांमधील सिनेमांचे विषय नेहमीच वैविध्यपूर्ण असतात आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. विषय चांगला असेल तर ते काम मी भरपूर एन्जॉय करतो. लोकेश गुप्ते हे एक उत्तम अभिनेते असल्याने त्यांच्यासोबत काम करण्यास फार सोपे जाणार आहे.”
मराठी भाषेविषयी बोलताना के.के सांगतात, “मला मराठी भाषा समजते परंतु नीट बोलता येत नाही. त्यामुळेच मी सध्या ती शिकण्याचा प्रयत्न करतोय. माझा मराठीचा अभ्यास सध्या सुरू आहे.सिनेमाची भाषा जर तुम्हाला येत नसेल तर मग संपूर्ण प्रक्रियाच अवघड होऊन जाते.”
के.के.मेनन यांच्या चाहत्यांसोबतच संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला त्यांच्या पदार्पणाची उत्सुकता लागून राहिली आहे. के.के मेनन यांना मराठीच्या नवीन इनिंगसाठी पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा!