कॉर्पोरेट जगातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, 'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच 300 व्या प्रयोगाचा महत्वपूर्ण टप्पा गाठणार आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना 'डोण्ट वरी बी हॅप्पी' करणाऱ्या या नाटकाचा, ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवार, दि. 12 रोजी त्रिशतकी महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे उमेश कामत आणि स्वानंदी टिकेकर यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
पती-पत्नीच्या स्ट्रेसफुल आणि तितक्याच सहज आणि नाजूक नात्यावर भाष्य करणारे हे नाटक रसिकप्रेक्षकांच्या मनात आजही मोहिनी घालण्यास यशस्वी ठरत आहे. कारण, आजच्या बहुमाध्यमांच्या काळात एखादे नाटक ३०० वा प्रयोगांपर्यंत मजल मारणे ही खरंच असाध्य गोष्ट असून, या नाटकाने ते साध्य करून दाखवले आहे.
सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित,मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील, उमेश कामत आणि स्वानंदी टिकेकर ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरत आहे.
या नाटकाचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास पाहता, स्पृहा जोशीने गाजवलेल्या प्रणोती पात्राला स्वानंदी टिकेकरने चांगलाच न्याय दिला असल्याचे पाहायला मिळते आहे. कारण, स्वानंदीच्या रूपातली ही नवी प्रणोती पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा नाटक पाहण्यास येत असल्याचे दिसून येत आहे.
आजच्या तरुण पिढीच्या वैवाहिक जीवनाची व्यथा सांगणाऱ्या या नाटकाने अनेक वैवाहिक दाम्पत्यांसाठी काऊन्सिलिंगचे काम केले आहे. वर्कहोलिक जगात स्वतःसाठी वेळ काढू न शकणाऱ्या जोडप्यांना हे नाटक एकत्र आणण्यास यशस्वी ठरत असून, यापुढेदेखील हे नाटक आपले कार्य असेच कायम राखत, ४०० प्रयोगांचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा केल्यास काही वावगं ठरणार नाही.