आज बॉलिवूडच्या चांदनीचा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने दिवंगत श्रीदेवी यांची कन्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मिडीयावर आईसोबतचा एक खास फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
जान्हवीने इन्स्टाग्रामवर श्रीदेवीसह आपल्या लहानपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी वडील बोनी कपूर आणि आई श्रीदेवीसह दिसतेय. तिने आईला शुभेच्छा देत, आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीदेवींच्या जाण्याने फक्त आपण एक अभिनेत्रीच गमावली नाही तर कपूर कुटुंबियांचा आधारस्तंभसुध्दा हरपला आहे. मोठ्या कष्टाने आणि धैर्याने बोनी कपूर आणि मुली जान्हवी व खुशी या कठिण प्रसंगातून सावरल्या आहेत.
https://www.instagram.com/p/BmY_9-BBful/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control
जान्हवी कपूरने ‘धडक’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. पण दुर्देवाने जान्हवीचं हे यश पाहायला आज श्रीदेवी नाहीत.‘धडक’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान जान्हवीला आईच्या आठवणीनं फार गहिवरुन आलं होतं. जान्हवी म्हणाली, आई नेहमी म्हणायची “सैराटसारख्या सिनेमाद्वारे तू पदार्पण करावं,असं मला वाटतं”, पण आज हे पाहायला आई नाही.
जान्हवी पुढे सांगते, “मी आईसोबत घरी ‘सैराट’ पाहिला होता. मला आठवतंय, आई म्हणाली होती, माझा पहिला सिनेमा असा असता तर, पुढे आई खुप काही म्हणाली होती, सिनेमाबद्दल त्यावेळेस. मलासुध्दा असा सिनेमा, अशी भूमिका मिळायला हवी अशी आईची इच्छा होती. पुढे हे करण जोहर यांच्यामुळे शक्य झालं. आईने ‘धडक’ सिनेमाची पहिली 25 मिनिटे पाहिली होती, त्यावेळेच्या माझ्या मेकअपवरुन माझ्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. त्यानंतर ती अशीसुध्दा म्हणाली होती, की मध्यातरानंतर तुझ्या चेह-यावर मेकअप अजिबात दिसायला नको, पण एकूणच ती माझ्या या सिनेमाविषयी खुपच उत्सुक व खुश होती.”